ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्ट. जनरल आर. आर. निंभोरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वर्धा जिल्ह्यातील वडाळा या गावामध्ये मूळ असलेल्या निंभोरकरांनी या लष्करी कारवाईमध्ये नियोजनापासून ते ती पार पडेपर्यंतच्या टप्प्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाकिस्तानच्या हालचालींकडे भारतीय लष्कराचे बारीक लक्ष असून भारतीय लष्कर सुसज्ज असल्याची ग्वाही निंभोरकर यांनी पीटीआयशी बोलताना दिली. इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून 1979 मध्ये 15 पंजाब फोर्समध्ये निंभोरकर नियुक्त झाले. विशेष म्हणजे अनेक शौर्य पदकांनी सन्मानित झालेले निंभोरकर कारगिल युद्धामध्येही सहभागी झाले होते. कारगिल युद्धादरम्यान जखमी झालेल्या निंभोरकरांना पराक्रम पदकानं गौरवण्यात आले होते.
भारतीय लष्करातील एक अत्यंत पराक्रमी आणि मान मरातब मिळणाऱ्या उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये निंभोरकरांचा समावेश होतो. नियंत्रण रेषेच्या पलीकडे घुसत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय लष्कराबरोबरच या कामगिरीमध्ये महत्त्वाचा सहभाग असलेल्या लेफ्ट. जनरल निंभोरकरांना लोकमतचा मानाचा मुजरा.