मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला तिढा एक प्रकारचे राजकीय षड्यंत्र आहे. जम्मू-काश्मीरच्या धर्तीवर महाराष्ट्राचे त्रिभाजन करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठीच सत्ता स्थापनेच्या नावाखाली सर्वत्र प्रादेशिक, राजकीय आणि भावनिक वाद आणि चर्चा चालवल्या जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.वंचित आघाडीच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी भाजपसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही लक्ष्य केले. महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा भाजपचा डाव आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करून उर्वरित महाराष्ट्रातून विदर्भसुद्धा वेगळा करण्याची चिन्हे नजरेआड करता येणार नाहीत. त्रिभाजनात विधानसभेचा अडथळा येऊ नये यासाठीच जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीसोबतची युती तोडून विधानसभा डळमळीत केली आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, असे आंबेडकर म्हणाले.राज्यांच्या विभाजनाकरिता जनमताचा कौल आवश्यक असतो. संसदीय राजकारणात विधानसभेचा कौल हा जनमताचा कौल मानला जातो. त्यामुळे पक्षीय विधानसभा अस्तित्वात असण्यापेक्षा राष्ट्रपती राजवटीत राज्यपालांच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या हा कौल मिळवणे सोपे असते. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, त्यावरून उपरोक्त विभाजनाचा संशय येण्यास प्रबळ कारण उपलब्ध आहे. आजवरचा राजकीय तसेच महाराष्ट्राचा इतिहास बघता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे राजकारण सहज ध्यानात येईल. असेही आंबेडकर म्हणाले.
राज्याच्या त्रिभाजनाचा डाव; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 3:41 AM