कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद करताना जसेच्या तसे रूपांतर न करता त्यातील भाव, आशय समजून घेतला आणि मराठीतील समृद्ध दालन हिंदीतही खुले केले. त्या अनुभवांचा उलगडलेला पट...
पुण्याला जाणं झालं तर पु.ल. देशपांडे ‘पीएल’शी भेटणं व्हायचंच आणि नाशिकला गेलं तर वि.वा. शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ यांची भेट होणं अपरिहार्यच असायचं. मुंबईतून बाहेर पडण्याचे हे दोन मार्ग आणि या दोन्ही शहरांत मराठी साहित्याचे विद्वान आणि कवी राहायचे. ‘कुसुमाग्रज’ यांना दोन-तीनदा भेटलोय. पीएलना तर किती तरी वेळा आणि कित्येक वर्षांपासून भेटतच होतो. दोघांचंही साहित्य वाचलं. त्यांची नाटकं वाचली, बघितली आणि मराठीतील जाणकार मित्रांकडून किंवा इंग्रजी आणि हिंदी-उर्दू भाषेतील त्यांच्या अनुवादाच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल ऐकत आलो होतो. या मित्रांमध्ये मराठीतील कवी अरुण शेवते हे असे मित्र होते की, ते नाशिकच्या प्रवासात माझ्यासोबतही होते.
कुसुमाग्रजांच्या कवितेची शैली मला स्पर्शून गेली होती. त्यांची अनलंकृत आणि साधी अभिव्यक्ती मला विशेष आवडायची. काही कठीण कविताही ते लिहायचे, परंतु रोजच्या जगण्यातील नेहमीच्या शब्दातून आणि छोट्या छोट्या वाक्यांत त्याची मांडणी करणं हे त्यांचं विशेष असायचं. जेव्हा हिंदी-उर्दू मित्रांसोबत या कवितांसोबत एकत्र प्रवास करण्याची इच्छा झाली तेव्हा अरुण शेवते मदतीला आले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पन्नास-साठ कविता निवडून माझ्याकडे सुपुर्द केल्या, पट्टीच्या पोहणाऱ्या मित्रासारखं मला पुलावरून पाण्यात ढकलून दिलं आणि पाठ वळवली. मी पाण्यात बुडणार नाही असं गृहीत धरलं आणि बुडलोच तर ते मदत करण्यासाठी परतलेच असते. पण मी बुडलोही नाही आणि त्यांना परतावंही लागलं नाही. एक छोटीशी, छटाक भासणारी मुलगी अमृता सुभाष हाती आली. तिला एका कार्यक्रमांत कुसुमाग्रजांच्या कविता वाचताना ऐकलं होतं आणि त्या कविता वाचत असताना, त्याचा हिंदीमध्ये भावानुवाद करून समजावून सांगत असे. समजावताना इंग्रजी, हिंदी आणि हावभावांचाही उपयोग करायची, मग मीही तिला पुलावरून पाण्यात माझ्याकडे ओढलंच. तीही माझ्यासोबत पाण्यात पोहत, गटांगळ्या खात खात शेवटी आज जिथे आहोत, त्या किनाऱ्यावर पोहोचली.
शंभरहून अधिक कवितांचा अनुवाद आम्ही आजपर्यंत करू शकलो. मी मूळ कविता ज्या छंदात आहे त्या छंदात तशीच ती ठेवली असती आणि त्यातलं यमक तशाला तसं जुळवण्याचा अनुवाद करतानाही प्रयत्न केला असता तर मूळ कवितेतील कल्पनेला आणि आशयाला छेद गेला असता. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या मूळ कवितेचं सौंदर्य आणि त्यांची अभिव्यक्तीची शैली बदलली असती म्हणून मी त्या कवितेच्या जवळून नव्हे तर सोबत जायचं ठरवलं. जेणेकरून कुसुमाग्रजांच्या कवितेची शैली आणि त्याचा अर्थ हिंदुस्थानी भाषेत अनुवाद झाल्यावरही बदलणार नाही.
उदा. गर्भा सलामत भगवान पचास, हिंदीत हे लिहिताना, वाक्प्रचार हजारांचा होईल, पण मूळ अर्थ तसाच राहील. गर्भा सलामत भगवान हजार तरी सगळ्या कविता ठरावीक मात्रांमध्ये आहेत, मीटरमध्येही आहेत. त्या सगळ्या फक्त कविताच आहेत, गद्य काव्य नाहीत. कवितांची शीर्षकंही तीच मूळ मराठी कवितेतीलच आहेत. म्हणजे हिंदीत रूपांतरण झाल्यानंतरही शीर्षकामुळे त्या सापडायला कठीण जाऊ नयेत. त्यासारखीच एक छोटी कविता आहे, ‘मिडल क्लास’. या कवितेत दोन-तीन ओळींचा क्रम बदलला आहे. परंतु त्यातला गर्भितार्थ व रूपक कायम आहे.
‘शरीर’ नावाची अजून एक कविता आहे, त्यातली पहिल्या ओळीची शेवटी पुनरुक्ती केल्याने त्यातला गर्भितार्थ अधिक प्रभावीपणे पोहोचतोय असं मला वाटतं. मराठी माझी मातृभाषा नाही, परंतु अशा जमिनीची भाषा आहे, ज्या जमिनीने माझं गेली पन्नास वर्षं पालनपोषण केलं आहे. पंजाबमधून उखडलेल्या माझ्या मुळांना आधार दिला आहे. महाराष्ट्राच्या समुद्री हवेचं मीठ मी खाल्लं आहे. या भाषेची गंमतही मला कळते, त्या भाषेचा मी ऋणी आहे, ते ऋणच मी चुकवतोय.
भावानुवाद : अंजली अंबेकर