विधान परिषद काँग्रेस गटनेतेपदी अमरनाथ राजूरकर तर मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 04:13 PM2022-03-22T16:13:35+5:302022-03-22T16:14:08+5:30
Congress News: महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेतेपदी आ. अमरनाथ राजूरकर तर मुख्य प्रतोदपदी आ. अभिजित वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई - आमदार अमरनाथ राजूरकर आणि आमदार अभिजित वंजारी यांच्याकडे काँग्रेस पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेतेपदी आ. अमरनाथ राजूरकर तर मुख्य प्रतोदपदी आ. अभिजित वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सभागृहात ही घोषणा केली. अमरनाथ राजूरकर नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असून अभिजीत बंजारी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले व वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सदर नियुक्ती संदर्भात पक्षश्रेष्ठींनी शिफारस केली होती. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सदरहू निर्णय घेतला आहे. आ. अमरनाथ राजूरकर व आ. अभिजीत वंजारी यांच्या नियुक्तीचे दोन्ही सभागृहातील काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी स्वागत केले आहे.