मुंबई : सोमवारी जोरदार पावसातही विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी चांगले मतदान झाले. गुरूवारी २८ जूनला मतमोजणी होणार आहे.एरवी अत्यल्प मतदार नोंदणी आणि मतदानामुळे या निवडणुका दुर्लक्षितच राहतात. निवडणूक आयोगाने मतदानानंतर जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार मुंबई पदवीधर मतदारसंघात ५३.२३ टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघ ८३.२६, कोकण पदवीधर मतदार संघ ७३.८९ तर नाशिक शिक्षक मतदार संघात विक्रमी ९२.३० टक्के मतदान झाले. सर्वच उमेदवारांनी मतदानाचा टक्का वाढल्याचा आपल्याला फायदा होणार असल्याचे दावे केले आहेत.मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपाचे अमित मेहता, काँग्रेस आघाडी आणि शेकापचे राजेंद्र कोरडे, अपक्ष उमेदवार दिपक पवार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि मनसेचे पुरस्कृत उमेदवार राजू बंडगर यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील, भाजपा पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासह एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात लढत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपाचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, आघाडी पुरस्कृत संदिप बेडसे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत.निवडणुकीत सोशल मीडियातून बदनामीकारक प्रचार केल्याच्या कारणावरून किशोर दराडे व संदीप बेडसे यांच्या समर्थकांमध्ये भालेकर शाळेच्या मतदान केंद्राबाहेर हाणामारी झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.
विधान परिषद निवडणूक : चार जागांसाठी भरघोस मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 2:48 AM