विधान परिषद निवडणूक शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत पुढे ढकलण्यात आली होती. या चार मतदारसंघांतील निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे शिवसेना गटाने दोन मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरेंचे विश्वासू असलेले आणि किरीट सोमय्या-ईडी हात धुवून मागे लागलेल्या अनिल परबांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
अनिल परबांचे विधान परिषद सदस्यत्व २७ जुलै रोजी संपत आहे. विलास पोतनिस यांचे तिकीट कापण्यात आले आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष असलेले ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून सध्या कपिल पाटील आमदार आहेत. आता भाजपा इथे कोणाला उतरविते याकडे पाहणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक १० जूनरोजी जाहीर करण्यात आली होती. परंतु ती दहा दिवसांपूर्वीच पुढे ढकलण्यात आली होती. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. आयोगाने या संदर्भात विचारविमर्श करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उक्त द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम...३१ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. शेवटची मुदत ७ जून ठेवण्यात आली आहे. अर्जाची छाननी १० जून, अर्ज माघारी घेण्यासाठी १२ जून आणि मतदान २६ जून रोजी घेतले जाणार आहे. तर मतमोजणी १ जुलै २०२४ रोजी घेतली जाणार आहे.