लातूर : शासनाने शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी दिली, ही चांगली बाब आहे़ परंतु, यंदाच्या मोसमात पेरण्या झालेल्या नाहीत़ त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. केंद्र व राज्य शासनाने विचारविनिमय करुन त्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केले.सेनेतर्फे लातूर शहर व जिल्ह्यात ५० टँकरने मोफत पाणी पुरवठा, १०० ग्रामपंचायतींना तीन हजार लिटर्सची प्रत्येकी एक पाण्याची टाकी तसेच शहरात कचरा कुंड्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सभेत ठाकरे म्हणाले, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही, ते पाहण्याचे काम शिवसैनिकांचे आहे़ खचलेल्या शेतकऱ्यांना शिवसैनिकांनी दिलासा दिला पाहिजे़ दुष्काळ निवारणासाठी शासनाला सूचना करण्यास काही हरकत नाही़ परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसेल तर पावसाळी अधिवेशनात जाब विचारता येईल.मी भाषणासाठी आलेलो नाही, मी दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या येथील जनतेला भेटायला, दिलासा द्यायला आलो आहे़ भाषणे करणारे दुसरे. आम्ही कोरडा दिलासा देत नाही अन् दुष्काळावर राजकारणही करत नसल्याचे उद्धव यांनी सांगितले. दुसऱ्यांची उणीधुणी काढण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांसाठी तुम्ही काय केले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमधील कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली. खा. सुळे यांनी काही दिवसांपूर्वी या भागाचा दौरा केला होता.सेनेतर्फे दुष्काळग्रस्तांना पाण्याच्या टाक्या, जनावरांसाठी सिमेंटचे हौद, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्यात आले. शिवजल क्रांती योजनेसाठी भैरवनाथ शुगर उद्योग समुहाचे उपाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी ५१ लाखांचा धनादेश उद्धव यांच्याकडे सुपूर्द केला.‘शिवजलक्रांती योजनेस प्रोत्साहन देणार’बार्शी (सोलापूर) व मराठवाड्यासह अनेक भागात शिवसैनिकांनी चांगले काम केले असून, बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांना मदत करण्यास शिवसेना मागे राहणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी बार्शी येथे दिली. परंडा- बार्शी तालुक्यातील योजनेच्या कामांची ठाकरे यांनी पाहणी केली़
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा
By admin | Published: May 05, 2016 1:41 AM