पुणे : मृत शेळीच्या मांसात विष घालून बिबट्याची शिकार केल्याचा गंभीर प्रकार सिंहगडच्या जंगलात घडल्याचे समोर आले आहे. तस्करीसाठी या बिबट्याचे पंजेही तोडण्यात आले आहेत. वन विभागाने या शिकारप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून, त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.सिंहगडच्या पश्चिमेस असलेल्या रांजणे गावच्या सुतारदरा परिसरात हा प्रकार घडला. वन विभागाला मंगळवारी याबाबत माहिती मिळाली होती. गावातील नथु तामकर (६०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा-सात दिवसांपूर्वी बिबट्याने शेळीची शिकार केली. त्यामुळे मृत शेळीच्या शरीरात तामकर याने विषारी औषध टाकले. ते खाल्ल्याने बिबट्याचा जागेवरच मृत्यू झाला. तामकर याने कुऱ्हाडीने बिबट्याचे चारही पंजे तोडले. त्याचे दातही काढले. नंतर मृत बिबट्याला जवळील दरीत फेकून दिले. मंगळवारी नागरिकांनी याबाबत वन विभागाला कळविल्यानंतर, वन विभागाचे कर्मचारी, मावळा जवान संघटनेचे गिर्यारोहक व नागरिकांनी बिबट्याला दरीतून वर काढले. तामकरकडे अधिक चौकशी केल्यानंतर, त्याने बिबट्याला मारल्याचे कबूल केले.
विषप्रयोग करून बिबट्याची शिकार
By admin | Published: November 15, 2015 2:22 AM