ऑनलाइन लोकमत
मलकापूर (सातारा), दि. 30 - आगाशिव डोंगराच्या पायथ्याला शिवारात बसविलेल्या मेंढ्यांच्या वाड्यानजीक बांधलेल्या घोड्यांवर बिबट्याने हल्ला केला. जखिणवाडी, ता. क-हाड येथे ‘पिंपरणी’ नावाच्या शिवारात सोमवारी रात्री ही घटना घडली. या हल्ल्यात एक घोडा ठार झाला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच डोंगर पायथ्याच्या शिवारात ग्रामस्थांनी एकट्याने जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जखिणवाडी येथे आगाशिव डोंगराच्या पायथ्याला मोठे शिवार आहे. सध्या या शिवारात काही शेतकºयांनी शेतजमीन खतविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी मेंढ्यांचा वाडा बसविला जात आहे. पिंपरणी शिवारातील ‘कमळभैरी’ मंदिरानजीक सुखदेव बिरू येडगे व शिवाजी पाटील यांची शेतजमीन असून, सध्या येथील पीक निघाले आहे. त्यामुळे सुखदेव येडगे यांनी जमीन खतविण्यासाठी मेंढ्यांचा वाडा बसविला आहे. आबासाहेब दशरथ येडगे यांच्यासह बारा कुटुंबांच्या सुमारे बाराशे मेंढ्या असून, सध्या त्या मेंढ्यांचा वाडा सुखदेव येडगे व शिवाजी पाटील यांच्या शेतात बसविण्यात आला आहे. आबासाहेब हे मेंढपाळ असून, ते जखिणवाडीतीलच आहेत. सोमवारी सकाळी आबासाहेब हे मुलांसह मेंढ्या घेऊन शिवारात गेले होते. दिवसभर मेंढ्या चारल्यानंतर सायंकाळी ते वाड्याच्या ठिकाणी आले. त्यांनी त्यांच्या सर्व मेंढ्या वाड्यात बसविल्या. तसेच त्यांच्याजवळ असणारा घोडा त्यांनी राहुट्यांपासून काही अंतरावर बांधला. त्यानंतर जेवण करून सर्व कुटुंबीय झोपी गेले. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आबासाहेब यांच्यासह कुटुंबीयांना जाग आली. त्यांनी वाड्यापासून फेरफटका मारला. त्यावेळी वाड्यानजीक बांधलेला घोडा मृतावस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घोड्याच्या गळ्याला श्वापदाने चावा घेतल्याचे त्यावेळी दिसून येत होते. मात्र, नेमका काय प्रकार झाला, हे येडगे कुटुंबीयांना समजले नाही.
ही घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनीही त्या ठिकाणी धाव घेतली. मंगळवारी सकाळी वनविभागाचे वनपाल एस. ए. जाधवर, वनरक्षक डी. बी. बर्गे त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली असता शिवारात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. तसेच घोड्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यावरून हल्ला करणारे श्वापद बिबट्याचे असल्याची खात्री वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिन्यातील चौथी घटना
आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीस धनाजी दादा बुधे यांची रानात चरायला नेलेली शेळी बिबट्याने फस्त केली. पंधरा दिवसांपूर्वी चिमाजी येडगे यांच्या घरातील महिला शेळी बांधून शिवारात भांगलण करीत असताना बिबट्याने ती शेळीही फस्त केली. तसेच भैरवदरा शिवारात आनंदराव डार्इंगडे यांच्या शेळीवरही बिबट्याने हल्ला केला होता.
बाराही महिने बिबट्याची भीती
जखिणवाडीतील दहा ते बारा कुटुंबांच्या सुमारे दीड हजार मेंढ्या व शेळ्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून भैरवदरा येथील पिंपरणीचा मळा शिवारात शिवाजी पाटील यांच्या शेतामध्ये या मेंढ्यांचा वाडा आहे. बिबट्याचा हल्ला होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने बाराही महिने ही कुटुंबे भीतीच्या छायेखाली असतात.
कोल्हापुरातील मेंढपाळाकडून जखिणवाडीतील बिरोबा देवासाठी घोडा घेतला होता. देवाच्या पालखी मिरवणुकीत त्याचा वापर केला जात होता. इतरवेळी ज्याठिकाणी मेंढ्या न्यायचो त्याठिकाणी घोडाही चरण्यासाठी घेऊन जायचो. रात्री राहुट्यांपासून काही अंतरावर घोड्याला बांधले होते.
- आबासाहेब येडगे, मेंढपाळ