पुणे/कोंढवा : कोंढव्यातील एनआयबीएम इन्स्टिट्यूटमध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ बँक मॅनेजमेंट) बिबट्या शिरल्याने शनिवारी एकच खळबळ उडाली़ वनविभाग आणि कात्रज प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू टीमला तीन तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात यश आले़ तपासणीनंतर सायंकाळी त्याला दोन वाहनांतून जंगलात नेऊन सोडून देण्यात आले़ संस्थेत एका बाजूला चहापाणी करण्यासाठी एक छोटी रूम आहे़ त्या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी सकाळी साडेसातच्या सुमारास सफाई कामगार स्वाती कुंजीर आल्या होत्या़ त्यांनी वॉशबेसिन सुरू करताच त्याच्या खाली बसलेला हा बिबट्या बाहेर पडला व तेथून समोरच असलेल्या कॉम्प्युटर रूममध्ये त्याने धूम ठोकली़ बिबट्याला पाहून कुंजीर या ओरडतच बाहेर आल्या़ त्यांनी ही बाब सुरक्षारक्षकांना सांगितली़ त्यांनी कॉम्प्युटर रूमचे दार बाहेरून बंद करून संचालकांना कळविले़ त्यांनी येऊन पाहणी केल्यावर वनविभागाला कळविले़ पावणेनऊच्या सुमारास कात्रज प्राणिसंग्रहालयातील नीलमकुमार खैरे रेस्क्यू टीमला घेऊन घटनास्थळी आले आणि बिबट्याला जेरबंद केले. (प्रतिनिधी)
पुण्यात एनआयबीएम इन्स्टिट्यूटमध्ये बिबट्या
By admin | Published: December 25, 2016 3:04 AM