दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील गिरोडे येथील जंगलात अज्ञात शिकाऱ्याने लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याने गावात एकच खळबळ उडाली. मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. फासकीतून सुटका करून घेण्यासाठी बिबट्याची चाललेली धडपड आणि त्याने धारण केलेले आक्राळ-विक्राळ रूप पाहून बघ्यांची पाचावर धारण बसली. वनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले, मात्र अथक प्रयत्नानंतर बिबट्याने स्वत:ची सुटका करून घेत जंगलात धूम ठोकली.
दोडामार्ग तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या बरीच आहे. त्यात बिबट्या, रानडुक्कर, गवेरेडे, सांबर यांचा प्रामुख्याने समावेश असतो. त्यामुळे शिकारीचे प्रमाणही वाढले आहे. तालुक्यात रानडुकरांसाठी फासकी लावण्याचे प्रमाण अधिक आहे. फासकीत जंगली प्राणी पकडून त्यांची शिकार केली जाते. अशाचप्रकारे शिकारीसाठी गिरोडेच्या जंगलात लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला. ही फासकी एका तोडलेल्या लाकडाच्या पाच फूट लांब ओंडक्याला बांधलेली होती. बिबट्याने जीवाच्या आकांताने फासकी ओढत नेत तेथीलच शाणी गवस यांच्या काजू बागेपर्यंत मजल मारली. मात्र तेथे फासकीला लावलेला ओंडका अडकल्याने त्याला पुढे जाता येईना.
फासकीतून सुटका करून घेण्यासाठी बिबट्याने आक्राळविक्राळ रूप धारण केले होते. त्याच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणून गेला होता. गिरोडे गावात आपल्या काजू बागायतीत जाताना तेथीलच शेतकरी नंदू गवस यांच्या निदर्शनास फासकीत अडकलेला बिबट्या आला. याबाबतची माहिती त्यांनी वनअधिकारी आणि गावकऱ्यांनाना दिली. एव्हाना बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. वनाधिकारी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी सावंतवाडीतून जाळी मागविण्यात आली. मात्र तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याने फासकीतून स्वत:ची सुटका करून घेत जंगलात पळ काढला आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
बिबट्याच्या रौद्र रूपाने अंगावर काटेफासकीतून सुटका करून घेण्यासाठी बिबट्याची चाललेली धडपड आणि त्यात येणाऱ्या अपयशामुळे त्याने धारण केलेला आक्राळविक्राळपणा अंगावर काटा आणणारा होता. फासकी आणि लाकडाच्या ओंडक्यासहीत शेजारच्या आंब्याच्या झाडावर चढलेला बिबट्या आणि त्याच्या नखांचे झाडावर आलेले ओरबाडे अक्षरश: काळजात धडकी भरविणारे होते.
...तर अनर्थ घडला असताफासकीतून सुटका करून घेण्यासाठी बिबट्याची जवळपास तीन तासाहून अधिक काळ धडपड सुरू होती. यादरम्यान बघ्यांची गर्दीही बरीच झाली. बिबट्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी जमली. मात्र ध्यानीमनी नसताना बिबट्याने स्वत:ची सुटका करून घेत दोन्ही बाजूच्या बघ्यांच्या मधून जंगलात पळ काढला. जर लोकांच्या दिशेने बिबट्या आला असता तर अनर्थ घडला असता.