कोल्हापूर : बिबट्या, वाघाटी (लेपर्ड कॅट), दुर्मीळ असलेले जंगल कॅट (बाऊल), रेडी मुंगुस अशा वन्यजिवांचे अस्तित्व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह राधानगरी, चांदोली आणि कोयना अभयारण्यांत दिसून आले आहे. त्यांच्या हालचाली कोल्हापूर वन्यजीव विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद झाल्या आहेत. वन्यप्रेमींसाठी ही आनंददायी बाब आहे.कोल्हापूर वन्यजीव अंतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्य, राधानगरी अभयारण्य, सागरेश्वर अभयारण्य ही जंगले येतात. या जंगलांत विविध प्रकारचे वन्यजीव आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी केंद्र व राज्य शासन स्तरांवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत उन्हाळा आणि हिवाळा ऋतूंमध्ये कॉरिडॉरमध्ये असलेल्या प्राण्यांच्या हालचाली, त्यांच्या अस्तित्वाच्या नोंदी आणि एकूण संख्या मोजली जाते. उन्हाळ्यातील ही प्रक्रिया ३ ते १२ मेदरम्यान पूर्ण करण्यात आली. त्यासह वन्यजीव विभागाने चांदोलीत शंभर, राधानगरीत ४० आणि कोयनामध्ये २० कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. त्याचीदेखील नोंदी घेतल्या आहेत. त्यात बिबट्या, वाघाटी, बाऊल, रेडीमुंगस, गेळा, रानकुत्रे, खवले मांजर आदी प्राण्यांच्या हालचालींचे नोंद झाली आहे. एक दुर्मीळ जातीचे हरिण दिसून आले आहे. (प्रतिनिधी)अशी झाली पाहणीराधानगरीतील २१ आणि चांदोली व कोयना अभयारण्यातील १९ बीटमध्ये पाहणी करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक बीटमध्ये गुगल मॅपच्या माध्यमातून ट्रान्ससेट लाईन निश्चित करण्यात आली. त्यात १५ ते १६०० मीटरपर्यंत ठराविक अंतरावर मार्किंग करण्यात आले. त्यात तृणभक्षी, मांसभक्षी प्राण्यांच्या नोंदी घेण्यात आल्या तसेच १५ आणि १ मीटर अंतरातील पहिल्या पाच झाडांच्या, झुडपांच्या नोंदी घेतल्या शिवाय १ मीटरमध्ये असलेले गवत, त्याची जात आणि त्याने किती जागा आच्छादली हे जाणून घेतले. तृणभक्षी प्राण्यांच्या नोंदी त्यांच्या विष्ठेच्या माध्यमातून आणि पाऊलवाटांवरून जावून मांसभक्षी प्राण्यांच्या पाऊलखुणा झाडांवरील ओरखडे याद्वारे अस्तित्व जाणून घेण्यात आले.यापूर्वी प्राण्याच्या पायांच्या ठशांद्वारे मोजणी केली जात होती. मात्र, ती शास्त्रीय पद्धतीने नव्हती. पण, यात आता सुधारणा झाली आहे. डेहराडूनमधील भारतीय वन्यजीव संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्राण्याच्या अस्तित्वाची पाहणी केली आहे. त्यासाठी एकूण ७० कर्मचारी कार्यरत होते. पाहणीतील नोंदी वन्यजीव संस्थेच्या संकेतस्थळावर आॅनलाईन भरण्यात येतील. शिवाय लेखी स्वरूपात त्या या संस्थेसह दिल्लीतील राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प संवर्धनला मुंबई कार्यालयाच्या माध्यमातून दोन आठवड्यांत पाठविण्यात येतील.- सीताराम झुरे, विभागीय वन अधिकारी वाघ, गेळा, सांभारचे अस्तित्वगुगल मॅपच्या माध्यमातून ट्रान्ससेट लाईन आखून प्राणी अस्तित्व पाहणी वन्यजीव विभागाने पूर्ण केली. त्यात तृणभक्षी प्राणी, मांसभक्षी प्राणी, वनस्पती, झुडपे यांची पाहणी करण्यात आली. त्यात वाघ आणि बिबट्याच्या विष्ठा, त्यांचे झाडांवरील ओरखडे, रानकुत्रे, अस्वल यांच्या पाऊलखुणा दिसून आल्या. शिवाय गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, गेळा आढळून आले.
बिबट्या, वाघाटी, दुर्मीळ हरण कॅमेरा ट्रॅपमध्ये
By admin | Published: May 13, 2015 11:36 PM