औरंगाबाद, दि.2 : सोयगाव तालुक्यातील बनोटी वन परिक्षेत्रातील वाडी सुतांडा येथील भपका-या शिवारात शनिवारी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वन अधिका-यांनी तात्काळ भेट देऊन तपास सुरु केला आहे.
वाडी सुतांडा हे गाव अजिंठा डोंगर रांगेला असून, या भागात नेहमीच हिंस्र प्राण्याचा वावर असतो. मागील आठवड्यात निंभोरा येथे बिबट्याने एका गायीचा फडशा पडला होता. शनिवारी सकाळी ११ वाजता वनरक्षक गणेश गिरी यांना वाडी गावातील ग्रामस्थांकडून माहिती मिळाली की, वाडी सुतांडा गावच्या शिवारातील नाल्यामध्ये नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत पडलेला आहे. वनरक्षक जी.डी. दांगोडे, गणेश गिरी हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृत्यूचे कारण अजून समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खरा प्रकार कळणार आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. काळे यांनी सांगितले.
दोन महिन्यात दुसरा मृत्यूविशेष बाब म्हणजे बिबट्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या जखमा नाहीत. त्यामुळे वन अधिकारी चक्रावले आहेत. दोन महिन्यांपूर्वी सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा तांडा येथेही एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. वन्य प्राण्यांचा मृत्यू हा एक चिंतेचा विषय बनला आहे. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. काळे, सहायक वनरक्षक वाघचौरे, वनपाल शिंदे, गणेश गिरी, वनरक्षक, दांगोडे तसेच वन समितीचे अध्यक्ष सर्जेराव जंजाळ, नितीन बोरसे, डॉ. सुभाष बोरसे, राजेंद्र बोरसे, वाडीचे पोलीस पाटील सुनील जाधव यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात आला.