संगमनेर : वासराच्या शिकारीच्या तयारीत असलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना तालुक्यातील समनापूर परिसरात घडली. वन विभागाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्यास जेरबंद केले आहे. समनापूर शिवारात देवराम दिघे यांचे शेत व विहीर आहे. विहिरीनजीक साहेब शेख यांनी घरासमोर गायीचे वासरू बांधले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधार्थ फिरणारा बिबट्या या परिसरात आला. शिकार करण्यासाठी बिबट्याने आगेकूच करताच वासराने जोरात हंबरडा फोडला. वासराच्या आवाजाला घाबरून बिबट्याने माघारी धूम ठोकली. मात्र पळताना अंधारात तो ६०-७० फूट खोल विहिरीच्या पाण्यात जावून पडला. वासराच्या आवाजाने झोपेतून उठलेल्या शेख यांनी विहिरीजवळ जावून पाहिले असता पाण्यात बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने परिसरातील ग्रामस्थांना बोलाविले. बाबा जाधव यांनी वन विभागाला माहीती दिली. दरम्यान वनक्षेत्रपाल बी. एन. गीते, साहेबराव बस्ते, प्रवीण चित्ते व इतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी जावून पाहणी केली. क्रेनच्या सहाय्याने विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचा पिंजरा बाहेर काढण्यात आला. त्याला निंबाळेच्या रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
वासराच्या हंबरड्याने बिबट्या विहिरीत
By admin | Published: June 06, 2016 11:46 PM