ठाणे : ठाण्याचे कार्यक्षम आयुक्त शहराला उत्तम, स्वच्छ व दुर्गंधीमुक्त फुटपाथ देण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण श्रीमंतांचे लाडके पाळीव कुत्रे सकाळ, संध्याकाळ या फुटपाथवर मलमूत्र विसर्जनासाठी फिरवले जाते. त्यापासून होणारी दुर्गंधी आरोग्यास घातक आहे. त्यास पायबंद घालण्यासाठी ठाणे महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहे.कुत्र्यांना फिरवण्याच्या नावाखाली रस्त्यावर आणले जाते. कोणाचीही भीती न बाळगता व दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी न घेता साळसूदपणे या कुत्र्यांना स्वच्छ फुटपाथवर मलमूत्र विसर्जन करायला भाग पाडले जाते. या मलमूत्रासह घोड्याची लीद, उंदीर, घुशी आदींचे मलमूत्र, वीर्य आदींचे पाण्यात मिश्रण होऊन लेप्टोपायरोसीससारखा जीवघेणा संसर्गजन्य आजार उद्भवू शकतो. त्यास वेळीच आळा घालण्यासाठी नागरी विकास मंच कायदेशीर बाजू मांडणार असल्याचे मंचचे सदस्य महेंद्र मोने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शहरातील काही नागरिक त्यांचे कुत्रे या रस्त्यांवर मलमूत्र करायला सोडतात. नौपाडा परिसरात परवाना दिलेले २०७ कुत्रे आहेत; पण त्यांच्या विष्ठेपासून होणाऱ्या समस्येकडे मात्र ठाणे मनपाने अद्यापही लक्ष दिलेले नाही. या कुत्र्यांच्या विष्ठेपासून बचाव करण्यासाठी ती संबंधित मालकाने वेळीच प्लास्टिकच्या पिशवीत भरून तिची विल्हेवाट लावणारे नियम, अधिनियम मनपाने तयार करणे अपेक्षित आहे. मासुंदा तलावाभोवती असणाऱ्या घोडागाड्यांच्या घोड्यांच्या लिदीची दुर्गंधी रहदारीच्या रस्त्यावर जीवघेणी ठरत आहे. या दुर्गंधीची अॅलर्जी असणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. हीच स्थिती सहयोग मंदिर येथील घाणेकर उद्यानाच्या बाजूच्या रस्तावरही आहे. नागरिकांना रस्त्यात पडलेल्या घोड्याचे मलमूत्र, लीद तुडवत ये-जा करावी लागत आहे. या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी महापालिकेचे लक्ष केंद्रित केले आहे.
पाळीव कुत्र्यांमुळे लेप्टोपायरोसीसचा धोका
By admin | Published: June 13, 2016 3:54 AM