ठाणे : जिल्ह्यात त्वचारोग, कुष्ठरोग शोध अभियान १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. याद्वारे जिल्ह्यातील ५१ लाख ९४ हजार ७८० जणांच्या त्वचेची तपासणी केली जाणार असून, त्यासाठी जिल्हाभरात तीन हजार २८३ पथके तैनात केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.राज्यातील कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असलेल्या १६ जिल्ह्यांत हे शोध अभियान राबविण्यात येत आहे. त्यात ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. प्रधानमंत्री प्रगती योजनेंतर्गत हे अभियान राबवले जात आहे. या शोध पथकांतील डॉक्टरांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. रोकडे व सहाय्यक संचालक डॉ. श्रीकांत बाभूळगावकर, उपसंचालक, डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक केम्फी पाटील यांनी केले. जिल्ह्यात कुष्ठरोगाचे प्रमाण ०.५६ दर हजारी एवढे आहे. त्यासाठी सध्या १५ कुष्ठरोग केंद्र कार्यरत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून विकृती प्रतिबंध व वैद्यकीय पुनर्वसन अंतर्गत पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, एस.सी.आर. चप्पल वाटप, स्लिप्लट्स, गॉगल्स, सेल्फ केअर किट , ब्लँकेट , चादर, आधारकाठी आदी सुविधा रु ग्णांना पुरविण्यात येत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. जिल्ह्यात १३ आॅक्टोबरपर्यत अभियान सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)
ठाणे जिल्ह्यात आजपासून कुष्ठरोग शोधमोहीम
By admin | Published: September 19, 2016 5:20 AM