मुंबई: पावसाळ््यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहाते, पण या साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा, असे आवाहन महापालिका करत आहे. डेंग्यूच्या पहिल्या बळीनंतर अवघ्या चार दिवसांच्या आत कांदिवली येथील ३५ वर्षीय महिलेचा लेप्टोमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतला हा लेप्टोचा पहिला बळी आहे. साचलेल्या पाण्यातून चालल्यास लेप्टोस्पायरा नावाच्या विषाणूंमुळे लेप्टोस्पायरोसिसची लागण होते. गेल्या वर्षी अचानक लेप्टोस्पायरोसिसने डोके वर काढले होते. कांदिवली पूर्व हनुमाननगर येथील जगदंबा चाळीत राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला १३ जुलै रोजी ताप आला होता. तिला धापही लागली होती. ताप वाढल्याने तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी तिला विचारले असता, साचलेल्या पाण्यातून चालत गेल्याचे तिने डॉक्टरांना सांगितले. लेप्टोचा धोका लक्षात घेऊन त्यानुसार, तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. क्लोरोक्यून आणि डॉक्सिक्लीन गोळ््या तिला देण्यात येत होत्या, पण तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शुक्रवारी तिचा लेप्टोस्पायरोसिसमुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत लेप्टोचे १५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. साचलेल्या पाण्यात उंदीर, कुत्रा, गाय, म्हैस यांचे मूत्र मिसळल्यास लेप्टोस्पायरोसिसची लागण होण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर, पायाला जखम झाली असल्यास धोका अधिक असतो. त्यामुळे पायाला जखम असल्यास घराबाहेर पडताना जखम झाकून बाहेर पडावे. साचलेल्या पाण्यात चालू नये, असे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. (प्रतिनिधी)
लेप्टोमुळे ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू
By admin | Published: July 18, 2016 5:00 AM