ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21 - नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या पश्चिम शाखेची धिम्या गतीने होत असलेली वाटचाल आणि उत्तरेकडील शाखेचा जोर कमी असल्याने देशभरातील ३६ विभागांपैकी १८ विभागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यापैकी सौराष्ट, गुजरात, पूर्व राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा ६० टक्क्यांहून कमी पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. मान्सूनच्या पश्चिम शाखेची वाटचाल येत्या दोन ते तीन दिवसांत वेगाने झाली तर ही सरासरी भरून काढली जाण्याची शक्यता आहे. केरळला यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले तरी आतापर्यंत तेथे जोरदार पाऊस झाल्याने सरासरीच्या केवळ १ टक्का पाऊस कमी झाला आहे. तामिळनाडूला आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला असून तेथे सरासरीच्या १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या रायलसीमा, तेलंगणा भागात आतापर्यंत चांगला पाऊस झाला असून, सरासरीपेक्षा १४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. पश्चिम व उत्तर शाखा अशा दोन्हीकडील पावसाचा लाभ झाल्याने आंध्र किनारपट्टी भागात सरासरीच्या ४५ टक्के इतका अधिक पाऊस झाला आहे. मान्सूनच्या उत्तरेकडील शाखेने यंदा जोरदार मुसडी मारली असल्याने मंगळवारपर्यंत त्याने दिल्लीपर्यंत धडक मारली आहे. यामुळे उत्तराखंड, चंदीगड, दिल्ली, पंजाब, छत्तीसगड या भागात यंदा चांगला पाऊस झाला आहे. १ जून ते १९ जूनदरम्यान देशभर झालेल्या पावसानुसार सौराष्ट्र (-९९), गुजरात (-९९) आणि पूर्व राजस्थान (-६५), पश्चिम राजस्थान (-५२) येथे सर्वात कमी पाऊस झाला. मान्सूनच्या उत्तर शाखेचा जोरदार प्रवास झाला असला तरी तिच्यात फारसा जोर नव्हता. त्यामुळे तिच्या मार्गात येणाऱ्या ईशान्यकडील राज्यात जोरदार पाऊस झाला तरी ओरिसा, बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन विदर्भातून झाले असले तरी आतापर्यंत विदर्भातही सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात पूर्वमोसमी व मोसमी पाऊस झाला असला तरी तो सरासरीपेक्षा अजूनही १७ टक्के कमी आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ४० टक्के आणि कोकणात ४७ टक्के कमी पाऊस झाला आहे. १ ते १९ जूनपर्यंतचा राज्यातील विभागावार पाऊस
विभाग सरासरी पाऊसपडलेला पाऊस टक्केवारीकोकण ३३१़४ १७६़४ -४७मध्य महाराष्ट्र७६़३ ४५़८ -४०मराठवाडा ७९़५ ६६़१ -१७विदर्भ ७१़६ ४३़४ -३९