‘मार्स आॅर्बिटर मिशन’च्या यशाचा टप्पा नागपूर : सोमवारच्या दिवशी नेहमीच्याच कामाची गडबड असली तरी विज्ञानप्रेमी नागपूरकरांचे लक्ष लागले होते ते ४ सेकंदांकडे. दुपारी २ वाजतानंतर तर उत्सुकता इतकी वाढली होती व अनेकांचे डोळे दूरचित्रवाणी संच व इंटरनेटकडे लागले होते. अखेर तो क्षण आला. मंगळ ग्रहाच्या गुरुत्वीय प्रभाव क्षेत्रात प्रवेश केलेल्या भारताच्या मंगळयानाचे मुख्य इंजिन व्यवस्थितपणे काम करीत असल्याची बातमी आली. अन् धडधडत्या हृदयाने, ‘फिंगर्स क्रॉस’ करून प्रतीक्षेत असलेल्या असंख्य नागरिकांचा जीव भांड्यात पडला. त्या ४ सेकंदांनी नवा उत्साह दिला अन् नकळतपणे तोंडातून शब्द बाहेर पडले, ‘हॅट्स आॅफ टू इस्रो’! ‘मार्स आॅर्बिटर मिशन’अंतर्गत निघालेल्या भारताच्या मंगळयानाने सोमवारी दुपारी मंगळाच्या गुरुत्वीय प्रभाव क्षेत्रात प्रवेश केला. यावेळी यानाची कक्षा सुधारण्यासाठी मुख्य इंजिन ४ सेकंदांसाठी प्रज्वलित करण्यात आले. तब्बल ३०० दिवस बंद असलेल्या इंजिनाच्या व्यवस्थित काम करण्यावर मोहिमेचे यश मोठ्या प्रमाणात अवलंबून होते. मागील वर्षी भाऊबीजेच्या मुहूर्तावर ‘मार्स आॅर्बिटर मिशन’ची सुरुवात झाली तेव्हादेखील नागपूरकरांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता. ‘इस्रो’च्या या प्रयत्नांमध्ये नागपूरकर शास्त्रज्ञांनीदेखील मोलाची भूमिका पार पाडली आहे. अगदी ‘इस्रो’च्या सुरुवातीच्या काळापासून ते अगदी आतापर्यंत निरनिराळ्या प्रकारे नागपूरकर वैज्ञानिकांनी प्रगतीत हातभार लावला आहे. त्यामुळे उपराजधानीतील विज्ञानप्रेमींना सोमवारची उत्कंठेने प्रतीक्षा होती. (प्रतिनिधी)ई-चावडीवर ‘मंगळ मंगळ’दरम्यान, सोशल नेटवर्किंग साईट्स तसेच मोबाईल अॅप्सवरदेखील दुपारनंतर मंगळयानाच्या ‘त्या’ ४ सेकंदांचीच धूम होती. फेसबुक, टिष्ट्वटर यांच्याप्रमाणेच व्हॉट्सअॅप, बीबीएमवरदेखील यंगिस्तानने ‘इस्रो’ला गुरुवारसाठी शुभेच्छा दिल्या. ‘आॅल द बेस्ट’मंगळाच्या गुरुत्वीय प्रभाव क्षेत्रात मंगळयानाचे इंजिन योग्य प्रकारे काम करू शकल्यामुळे ठरल्याप्रमाणे येत्या २४ सप्टेंबरला यान मंगळाभोवतीच्या अपेक्षित कक्षेत प्रवेश करणार आहे. २४ तारखेला सकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी यान मंगळाच्या कक्षेत शिरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागपूरकरांमध्ये विशेष उत्साह आहे. ‘असोसिएशन फॉर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन’ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मंगळ महोत्सव’ या भव्य विज्ञान प्रदर्शनाच्या स्वरूपात हा क्षण साजरा करणार आहे.
कम आॅन ‘इस्रो’!
By admin | Published: September 23, 2014 1:10 AM