- शंकर वाघ, शिरपूर जैन, जि.वाशिम
पारंपरिक पद्धतीने हळदीवर प्रक्रिया करणे हे काम वेळखाऊ आहे. त्यामुळे हळदीवर प्रक्रिया करण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत आहे. त्यावर वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील शेतकरी डॉ.गजानन ढवळे यांनी कल्पकतेतून स्वत:च हळदीचे प्रक्रिया यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या साह्याने कमी श्रमात हळदीवर प्रक्रिया होते, हे विशेष.
डॉ.ढवळे यांनी हळद प्रक्रिया यंत्राचा स्वत:च नकाशा (डिझाईन) तयार करू न त्याप्रमाणे यंत्रही तयार करू न घेतले आहे. तसेच या यंत्रानुसार बॉयलर तयार केले. पारंपरिक पद्धतीने कढईमध्ये दिवसभरात ५० क्विंटलपर्यंत हळदीवर प्रक्रिया होते. यासाठी इंधन जास्त लागते. शिवाय शेतकऱ्यांना अधिकचा त्रासही सहन करावा लागत होता. मात्र डॉ.ढवळे यांनी विकसित केलेल्या या यंत्रामुळे तेवढ्याच मजुरांकडून जवळपास २०० क्विंटल हळदीवर प्रक्रिया होते. शिवाय इंधनही ५० टक्के कमी लागते. शेतातील तूर पिकाच्या तुराट्या, कपाशीच्या प-हाट्यांचा या यंत्रासाठी इंधन म्हणून वापर करता येतो. कमी वेळात, कमी श्रमात जास्त काम होत असल्याने शेतकऱ्यांबरोबरच मजुरांचाही फायदा होत आहे.
विशेष म्हणजे, या यंत्राने हळद वाफेवर शिजविल्यामुळे सुकविण्यास कमी वेळ लागतो व दर्जेदार माल तयार होतो. हळदीमधील कुरकुमीन नावाचे महत्त्वाचे रसायन वाया जात नाही. त्यामुळे हळदीला भावही चांगला मिळतो. हळदीवर प्रक्रिया करण्याचे काम किचकट व वेळखाऊ असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरविली होती. मात्र डॉ.ढवळे यांनी हे यंत्र तयार केल्याने हळदीवर प्रक्रिया करण्याचे काम गतीने होऊ लागले. या यंत्रामुळे हळदीवरील प्रक्रिया करण्याचे श्रम वाचणार असल्याने पुन्हा हळद लागवडीकडे कल वाढू शकतो.