मुंबई : एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका अजूनही तपासण्यात आलेल्या नाहीत. जलद पेपर तपासणीसाठी सोमवारपासून आॅनलाइन पद्धतीने उत्तरपत्रिका कशा तपासायच्या या संदर्भातील प्रशिक्षणाचा पहिला धडा प्राध्यापकांनी गिरवला. मुंबई विद्यापीठातर्फे ५० केंद्रांवर प्राध्यपकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. प्रशिक्षण देण्याचे हे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या प्रणालीनुसार सोमवारी प्राध्यापकांनी आॅनलाइन प्रशिक्षणाचा पहिला धडा गिरवला. यावेळी आॅनलाइन पेपर कसे तपासायचे, यासंदर्भात प्राध्यापकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्रशिक्षण सुरू झाले असले तरी प्रशिक्षण देण्याचे हे काम नेमक्या कोणत्या कंपनीला देण्यात येणार आहे, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. गुरुवारी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे काम कोणत्या कंपनीला देण्यात येणार हे निश्चित होईल. पण जर पहिल्या दिवशी प्रशिक्षण दिलेल्या कंपनीची निवड करण्यात आली नाही, तर पुढील प्रशिक्षणाचे काय, पुन्हा दुसऱ्या कंपनीकडून प्रशिक्षण घ्यावे लागणार का, असा प्रश्न प्राध्यपकांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठाच्या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या दोन्ही कंपन्यांच्या तपासणी प्रक्रियेत भिन्नता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे दुसऱ्याच कंपनीची निवड झाल्यास पुन्हा प्रशिक्षणाचा सराव प्राध्यापकांना नव्याने करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
प्राध्यापकांनी गिरवला पेपर तपासणीचा धडा
By admin | Published: April 25, 2017 2:36 AM