ऑनलाइन लोकमतपेठ (नाशिक), दि. 15 - माहिती तंत्रज्ञानापासून कोसो दूर असलेल्या पेठ तालुक्यातील पंगुर्णेपाडा व भाटविहिरा या आदिवासी पाड्यावरील शाळेत आता चिमुकले पाटी-पेन्सिलऐवजी माऊस व किबोर्ड हाताळताना दिसून येत आहे. आपुलकी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून या शाळांना संगणक संच भेट दिल्याने दऱ्याखोऱ्यातही विद्यार्थी आता संगणकाचे धडे गिरवू लागले आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांची प्रगती खरोखरच कौतुकास्पद आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा आपुलकीचे अध्यक्ष विलास मुनोत यांनी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात येणारे अडथळे व मुलांमधील तंत्रज्ञानाची भिती दूर करण्यासाठी पंगुर्णपाडा व भाटविहिरा येथील शाळांना संगणक संच भेट दिल्याचे सांगितले. संस्थेच्या वतीने मुलांना स्कूल बॅग व खाऊचेही वाटप करण्यात आले. याप्रसंगी विलास मुनोत, नवनाथ चव्हाण, श्रीमती जोशी, विलास कड, डावरे, चैतन्य भडके, शांताराम गायकवाड, शाळा व्यवस्थापन समतिी अध्यक्ष हनुमान गायकवाड, भागवत राऊत, मुख्याध्यापक चंद्रकांत आवारी, वसंत देवरे, सुनिल नंदनवार यांचेसह ग्रामस्थ, शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते.( प्रतिनिधी )