दादाराव गायकवाड/कारंजा लाड (जि. वाशिम): बदलत्या वातावरणासह कमी होणार्या मागणीमुळे तेलबियांच्या पेरणीकडे अमरावती विभागातील शेतकर्यांनी पाठ फिरविल्याचे कृषी विभागाच्या गत दोन वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.गतवर्षीप्रमाणेच यंदाही सरासरी २६ हजार ४00 हेक्टरवर तेलबियांची पेरणी अपेक्षित असताना केवळ २ हजार १00 हेक्टरवर तेलबियांची पेरणी करण्यात आली असून, हे प्रमाण केवळ आठ टक्के आहे. अमरावती विभागात पूर्वी तीळ, जवस, करडई, कारळ, सूर्यफूल, भुईमूग आदी तेलवाणांचा पेरा मोठय़ा प्रमाणात होत असे. गळित हंगामात सूर्यफुलांनी बहरलेली पिवळी शेते सर्वत्र दिसायची; परंतु मागील काही वर्षांपासून सर्व सोयी-सुविधा असतानाही बदलत्या निसर्गचक्रामुळे कृषिव्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. याचा अनिष्ट परिणाम पारंपरिक पीकपेरणीवर होत असल्याचे दिसून येते. गत तीन वर्षांपासून अमरावती विभागात अत्यंत कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले असून, शेतकरी आता पेरणी करून आणखी धोका पत्करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नसल्याचे पीकपेरणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.गतवर्षी अमरावती विभागात सरासरी २६ हजार ४00 हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी अपेक्षित असताना केवळ २ हजार २00 हेक्टरवर पेरणी झाली. यंदाही केवळ २ हजार १00 हेक्टर क्षेत्रावरच शेतकर्यांनी तेलबियांची पेरणी केल्याचे कृषी विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. गतवर्षी करडईची पेरणी १ हजार ४00 हेक्टरवर झाली; यंदा मात्र केवळ ७00 हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकंदर, अमरावती विभागातील बदलते वातावरण, घटत चाललेली मागणी आणि नगण्य दरामुळे तेलबियांच्या पेरणीकडे शेतकर्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जवसाची पेरणीच नाहीगत दोन वर्षांत अमरावती विभागात एक हेक्टरवरही जवसाची पेरणी करण्यात आलेली नाही. यावरून हे तेलवाण नामशेष होत असल्याचे दिसत आहे. तिळाचेही प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटले असून, मागील दोन्ही वर्षांत प्रत्येकी २00 हेक्टरवर या तेलवाणाची पेरणी झाली आहे. सूर्यफुलाचा विचार करता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीक्षेत्रात ६00 हेक्टरची वाढ झाली आहे. तथापि, १४ हजार हेक्टरपैकी केवळ ८00 हेक्टरवर या तेलवाणाची पेरणी झाली असून, त्याच्या पेरणीचे प्रमाण केवळ सहा टक्के आहे.
तेलबियांकडे शेतक-यांची पाठ!
By admin | Published: January 23, 2016 2:01 AM