हणमंत गायकवाड ल्ल लातूरशेतकऱ्यांना कर्जमाफी न देता पीककर्जाचे पुनर्गठण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे़ मात्र याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, २०१५-१६ मध्ये २ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी ८९३ कोटींचे पीककर्ज घेतले होते़ त्यापैकी १ लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी ५२० कोटींच्या पीककर्जाचा भरणा केला आहे़ तथापि, ६१ हजार शेतकरी पीककर्ज पुनर्गठण करण्यास पात्र आहेत़ परंतु, २ हजार ४६६ शेतकऱ्यांनीच पीककर्जाचे पुनर्गठण केले आहे़जिल्हा अग्रणी बँकेकडून पीककर्ज पुनर्गठण करण्यासाठी शेतकऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत़ आतापर्यंत ३ मेळावे झाले असून, २७ जून रोजी आणखी एक मेळावा घेतला जाणार आहे़ ज्या शेतकऱ्यांनी २०१५-१६ मध्ये पीककर्ज घेतले होते़ त्या अल्पमुदतीच्या कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करणे म्हणजे पुनर्गठण करणे होय़ परंतू, शेतकऱ्यांचा पुनर्गठणाला प्रतिसाद मिळत नाही़ सोमवारीही काही बँकांनी पुनर्गठणासाठी मेळावा घेतला़ परंतू, तेथेही प्रतिसाद मिळाला नाही़ कर्जाचे पुनर्गठण केल्यानंतर ५ वार्षिक हप्त्यामध्ये कर्ज फेडणे होय़ पुनर्गठण करून पीककर्ज घेतल्यास पहिल्या दोन वर्षात ६ टक्के व्याज दर शासन भरणार आहे़ व ६ टक्के व्याजदार संबंधीत शेतकऱ्यांनी भरणे आहे़ लातूर जिल्ह्यात २ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी २०१५ - १६ मध्ये ८९३ कोटींचे पीककर्ज घेतले होते़ त्यात १ लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी पीककर्जाचा ५२० कोटींचा भरणा केला आहे़ त्यामुळे ६१ हजार शेतकरी ३८ कोटींच्या पीककर्ज पुनर्गठणासाठी पात्र आहेत़ गेल्या महिनाभरापासून पीककर्ज पुनर्गठण मोहिम राबविण्यात येत असली तरी ६१ हजारांपैकी केवळ २ हजार ४६६ शेतकऱ्यांनीच पीककर्जाचे पुनर्गठण केले आहे़ सत्ताधारी पक्ष वगळता अन्य राजकीय पक्षांकडून कर्ज माफीची मागणी करण्यात येत असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी आशा लागली आहे़ त्यामुळेच पीककर्जाचे पुनर्गठण नको या मानसिकतेत शेतकरी आहेत़ त्यामुळेच कर्ज पुनर्गठणाला प्रतिसाद मिळत नाही़
पीककर्ज पुनर्गठणाकडे शेतकऱ्यांची पाठ
By admin | Published: June 13, 2016 11:24 PM