दिगांबर जवादे, गडचिरोलीराज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका केंद्रात मागील दोन वर्षांपासून काही निवडक शाळांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच मूल्यशिक्षणही दिले जात आहे. याचे सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असल्याने हा कार्यक्रम आता संपूर्ण राज्यात राबविला जाणार आहे. तसे संकेत शिक्षणमंत्र्यांनी नुकतेच दिले आहेत.शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सांविधानिक मूल्ये रुजावी, या उद्देशाने मूल्यशिक्षण देण्यात येत आहे. प्रचलित शालेय शिक्षणातून हे ध्येय अपेक्षित पातळीपर्यंत साध्य होताना दिसत नव्हते. ही उणीव भरून काढण्यासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन, पुणे यांनी अशाप्रकारचा अभ्यासक्रम पहिली ते चवथ्या इयत्तेसाठी तयार केला. यामध्ये कृती व शिक्षण यांचा समावेश आहे. २०१५मध्ये मुथ्था फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. त्यानंतर २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात राज्यातील ३४ जिल्ह्यांतील प्रत्येक केंद्रातील शाळेत हा कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला. या अभ्यासक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन राज्यातील सर्व शाळांमध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार राज्य शासन करीत आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुणे येथे २९ सप्टेंबर बैठक झाली होती.
शाळांमध्ये आता मूल्यशिक्षणाचे धडे!
By admin | Published: October 06, 2016 5:28 AM