मुंबई : समाजकार्य हे एक व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्र असून त्याचा उपयोग व्यक्ती, गट, समुदाय, तसेच मनुष्याच्या सर्वांगीण विकासाकरिता होतो. यासाठीच मुंबई विद्यापीठाने मास्टर्स आॅफ सोशल वर्क अर्थात एमएसडब्ल्यू या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून सुरू होणार आहे.मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्रातर्फे हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. ही पदव्युत्तर पदवी असून हा अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातून शिकवला जाणार आहे. शिवाय मराठीतून शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे साहित्य मराठीतून पुरविण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. हा अभ्यासक्रम पूर्णवेळ २ वर्षांचा आहे. यासाठी विद्यार्थ्यांना चार दिवस अध्यापन आणि दोन दिवस क्षेत्र कार्य असेल. अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध होऊ शकतील. या अभ्यासक्रमाकरिता एकूण ६० जागा उपलब्ध असून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्रवेश मिळू शकेल. प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० जुलै आहे. अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
विद्यापीठात आता समाजसेवेचे धडे!
By admin | Published: July 19, 2016 3:41 AM