मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे काम चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचे आहे, कात्री लावण्याचे नाही. सिनेमागृहात जाणारे प्रेक्षक प्रगल्भ आहेत. त्यामुळे एखादा चित्रपट चांगला की वाईट हे त्यांनाच ठरवू देत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने ‘उडता पंजाब’वरून सेन्सॉर बोर्डाला फटकारले. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय आता सोमवारी होणार आहे. ‘उडता पंजाब’ चित्रपटातील ८९ दृश्यांना कात्री लावत चित्रपटाच्या नावातील ‘पंजाब’ हा शब्द पंजाब राज्याची बदनामी करणारा आहे. त्यामुळे तो काढून टाकण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने केली होती. या निर्णयाला चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सेन्सॉर बोर्डाने टोकाची भूमिका घेऊ नये, नवे प्रयोग करू द्यावेत. हा चित्रपट ड्रग्जला प्रसिद्धी देत आहे असे वाटत असेल, तर या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याऐवजी प्रदर्शित करण्याची परवानगीच देऊ नका. उलट तुम्हीच (सेन्सॉर बोर्ड) या चित्रपटाला प्रसिद्धी देत आहात, असे उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला खडसावले. चित्रपटाच्या नावातून ‘पंजाब’चा उल्लेख वगळण्याच्या सूचनेवरही न्यायालयाने संताप व्यक्त केला. पंजाब हाच या चित्रपटाचा मूळ गाभा आहे. एखादे स्थळ अथवा व्यक्तीविषयी चित्रपट असेल तर त्या व्यक्तीचा आणि जागेचा उल्लेख चित्रपटातून कसा वगळता येईल? ‘उडता पंजाब’मधील शिवराळ संवाद काढण्यात यावेत, अशीही सूचना सेन्सॉर बोर्डाने केली आहे. त्यावर न्यायालयाने म्हटले की, शिवराळ भाषा वापरल्याने कोणताही चित्रपट यशस्वी होत नाही. आताची पिढी सुजाण आहे. सिनेमात एखाद्या गोष्टीचा अतिरेक असल्यास प्रेक्षक आपोआप कंटाळतात. सध्याच्या काळातील चित्रपट विषय आणि संहितेवर चालतात. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने टोकाची भूमिका न घेता ते प्रेक्षकांवर सोडावे, असे उच्च न्यायालयाने सांगितले.
‘बंजर’ आणि ‘कंजर’ ला आक्षेपसेन्सॉर बोर्डाच्या वकिलांनी चित्रपटातील ‘जमीन बंजर तो औलाद कंजर’ या वाक्याला आक्षेप घेतला. त्यांच्या मते, पंजाब कृषिप्रधान असताना त्याचा उल्लेख बंजर असा करणे योग्य होणार नाही. शिवाय पंजाब हे अमली पदार्थाचे केंद्र असल्याचे दाखविण्यात आल्याने राज्याची बदनामी होते, असे वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने बोर्डाच्या वकिलांना चांगलेच फैलावर घेतले. चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखविण्यात आल्या असतील, तर प्रेक्षकांना त्या आवडणार नाहीत. त्यामुळे त्यांनाच ठरवू देत, तुम्ही कशाला उगीच चिंता करता? सेन्सॉर बोर्ड आणि याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद शुक्रवारी संपल्याने उच्च न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला. (प्रतिनिधी)
>काय आहे योजना?सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एका गाण्यातील ‘चित्ता वे’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. परंतु याच गाण्याचा मुखडा असलेल्या ट्रेलरला मात्र मंजुरी दिली. बोर्डाच्या या विसंगतीवर दिग्दर्शकाच्या वकिलांनी बोट ठेवले.