मुंबई : चंद्रपूर जिल्हा परिषद कृषी विभागाअंतर्गत कमी वजनाच्या आणि निकृष्ठ दर्जाच्या लोखंडी बैलगाड्यांचा पुरवठा करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले. भाजपा सदस्य अनिल सोले यांनी यांसर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री खोत म्हणाले, चंद्रपूर जिल्हा परिषद कृषी विभागांतर्गत शेतक-यांना लोखंडी बैलगाड्या पुरवठा करण्याचा निर्णय झाला होता. एकंदर १,४७१ लोखंडी बैलगाड्या पुरवण्यात येणार होत्या. त्यापैकी१,१८६ बैलगाड्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. तर अजूनही २८५ बैलगाड्या वाटप झालेल्या नाहीत. या लोखंडी गाड्या प्रत्येकी २४० किलो वजनाच्या देणे बंधनकारक होते. प्रत्यक्षात, प्रत्येक गाडीमागे २५ किलो वजनाची घट दिसून आली आहे. कमी वजनासोबतच या गाड्या निकृष्ठ दर्जाच्या असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकले जाईल असे आश्वासन राज्यमंत्री खोत यांनी दिले. तसेच याप्रकरणात दोषी आढळलेल्या अधिका-यांची चौकशी करुन त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. तसेच या सदोष बैलगाड्यांमध्ये सुधारणा करुन वाटप केल्या जातील असेही खोत यांनी सांगितले. लोखंडी गाड्या पुरवठा करणा-या दोन कंत्राटदारांची अजून ९६ लाख रुपयांची देयके देण्यात आली नसल्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बैलगाड्या पुरवठादार काळ्या यादीत टाकू
By admin | Published: July 28, 2016 4:31 AM