आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाकडे बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे मागणे मागितले. तसेच महापूजेनंतर आयोजित सत्कार सोहळ्यामधये मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विकास आराखड्यासह इतर अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले.
शासकीय महापूजेनंतर सत्कार सोहळ्यातून संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज आषाढी एकादशीनिमित्त मला सहकुटुंब, शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मिळालं. त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरामध्ये मंगलमय वातावरण झालेलं आहे. शासकीय महापूजा झाल्यानंतर तुम्ही विठुरायाकडे काय मागणं मागितलंत असा प्रश्न मला पत्रकारांनी विचारला. आता विठुरायाकडे काय मागणार, बळीराजाला चांगले दिवस येऊदेत, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊदेत. राज्यात पाऊस चांगला पडू दे. हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे. राज्यातील सर्व घटक सुखी समाधानी झाले पाहिजे. त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजेत हाच आपला उद्देश आहे. त्यांच्या जीवनात चांगले दिवस येऊ देत हेच मागणं मी विठुरायाकडे मागितलं, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यावेळी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांच्या सोईसाठी केलेल्या नियोजनाचाही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन उल्लेख केला. ते म्हणाले की, लाखो वारकऱ्यांची गैरसोय नाही म्हणून मी ३-४ दिवसापूर्वी पंढरपुरात आलो होतो. यावर्षी उत्तम नियोजन आपण पाहिलं. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या सगळ्यांनी मिळून अतिशय उत्तम नियोजन केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. वारकरी बंधूंनी सहकार्य केले त्यांचे मी आभारी आहे. पूजा सुरू असतानाही वारकऱ्यांसाठी मुखदर्शन एक मिनिटही बंद ठेवलं नाही हे आवर्जून सांगावं लागेल. वारकरी पायी दिंडी करायला त्यांच्या दर्शनामध्ये खंड पडू नये अशी भावना आमची होती. मानाचे वारकरी काळे परिवार यांच्यासोबत पूजा करण्याचा मान मला मिळाला. आरोग्यमंत्र्यांनी पंढरपुरात महाआरोग्य शिबिर आयोजन केलं. लाखो वारकरी या उपक्रमाचा लाभ घेतायेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.