ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तीक टीका केली होती. यावर आता जरांगे पाटलांनी सांगलीतील सभा संपताच प्रत्यूत्तर दिले आहे. छगन भुजबळ हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पाटलांनी केला आहे.
राजकीय नेत्यांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठा आणि ओबीसी यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होणार नाही. मात्र, छगन भुजबळ हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे षडयंत्र यशस्वी होणार नाही, असे वक्तव्य मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
छगन भुजबळ हे माझ्यावर वैयक्तिक टीका करत असून ते खालच्या पातळीवरच राजकारण करत आहेत. माझ्यावर टीका करण्या अगोदर तुम्ही पैसे खावून, जेल भोगून आला आहात याची आठवण तुम्हाला असू दे, असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, त्यामुळे मराठा बांधवांनी सुध्दा एक डिसेंबर 2023 पासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील 50 टक्के आहे. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला काढायला लावू नयेत. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. धमक्या देऊ नयेत, असे जरांगे म्हणाले.