कणकवली : झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’च्या १५० व्या भागाचे चित्रीकरण कणकवली विद्यामंदिर हायस्कूलच्या मैदानावर पार पडले. लाजवाब, कसदार अभिनय, धम्माल मौजमस्ती करत भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे या कलावंतांनी ही रात्र सिंधुुदुर्गवासीयांसाठी यादगार बनविली. पहिल्यांदाच खुल्या मैदानात घेतलेल्या या कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रसिकांनी मोठी गर्दी केली होती. ‘चला हवा येऊ द्या’च्या कलाकारांसोबतच ‘माझे पती सौभाग्यवती’ या सध्या लोकप्रिय असलेल्या मालिकेतील कलाकारांनीही विद्यामंदिरच्या पटांगणावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत धम्माल मजा आणि कसदार अभिनयाच्या सादरीकरणातून हजारो रसिकांना निखळ मनोरंजनाचा मनस्वी आनंद दिला. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नीलम राणे, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह हजारो रसिकांनी मनोरंजनाचा निखळ आनंद लुटला.‘चला हवा येऊ द्या’चे सूत्रधार डॉ. नीलेश साबळे यांनी मालवणी बोलीभाषेत बोलून प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. ज्यांना चित्रीकरणाच्या मैदानावर बसायला जागाच मिळाली नव्हती अशा हजारो रसिकांनी समोरील बिल्डिंगची गॅलरी, विद्यामंदिरच्या टेरेसवर मिळेल त्या जागी थांबून हा कार्यक्रम पाहिला. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण आता ११ व १२ जानेवारीला झी मराठीवर होणार आहे. (प्रतिनिधी)कोकणात मोठा चाहता वर्ग : सुगंधा लोणीकरमराठी मनोरंजन मालिकेतील सर्वांत लोकप्रिय झालेल्या या ‘चला हवा येऊ द्या’च्या रसिक प्रेक्षकांची संख्या महाराष्ट्रातील मराठी मुलखातच नव्हे, तर देशभरात फार मोठी आहे. विशेष म्हणजे जगभरात मराठीप्रेमी असणारा ‘हवा येऊ द्या’चा रसिकवर्ग आहेच, परंतु कोकणामध्ये चाहता वर्ग फार मोठा असल्याची माहिती झी मराठीच्या प्रसिद्धीप्रमुख संयोजिका व कार्यक्रम कोकणात व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मालवण तालुक्यातील कट्टा येथील सुगंधा लोणीकर यांनी सांगितले.
‘चला हवा येऊ द्या’ने रात्र बनली यादगार
By admin | Published: January 10, 2016 12:09 AM