Yogi Adityanath on PoK: लोकसभेच्या निवडणुकीची धूम सध्या देशभरात सुरु आहे. मतदान प्रक्रियेला मतदारांचा संमिश्र प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून त्यातील शेवटचा टप्पा शिल्लक राहिला आहे. पाचव्या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सहा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपाकडून मुंबईत प्रचारसभांमध्ये स्टार प्रचारकांचा धडाका लावण्यात आला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध अशा शिवाजी पार्कवर महायुती, राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी अशी मोठी सभा झाली. त्यानंतर आज पालघरमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेतली. या सभेत आदित्यनाथ यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल मोठे विधान केले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी महाराष्ट्रात पालघरमधील सभेला संबोधित करताना म्हणाले, "जो आमच्यावर हल्ले करतो त्याची आम्ही पूजा करणार नाही. जर कोणी आमच्या लोकांना मारले तर आम्ही देखील त्यांच्यावर प्रतिहल्ला करू. काँग्रेसच्या सत्तेच्या वेळी पाकिस्तानातून हल्ले केले जात होते. काँग्रेसला प्रश्न विचारल्यावर ते सांगायचे की दहशतवादी सीमापार आहेत. असे सांगून कसे चालेल. नरेंद्र मोदीपंतप्रधान झाल्यावर हे चित्र बदलले आणि आता पाकिस्तानला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आता पाकव्याप्त काश्मीर वाचवणेही पाकिस्तानला कठीण जात आहे. तुम्ही नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, पुढच्या 6 महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग झाल्याचे तुम्हाला दिसेल. हे करण्यासाठी हिंमत लागते. धाडस असेल तरच हे काम करता येते. मोदी हे काम नक्की करतील."
"आम्ही काँग्रेसला विचारायचो तेव्हा हे लोक म्हणायचे की पाकिस्तानातून दहशतवाद येत आहे मग आम्ही काय करू. आज पाकिस्तानने वाकड्या नजरेने पाहिले तरी डोळे काढले जातील याची त्यांना जाणीव आहे. आमच्यावर नजर रोखून पाहिल्यास आम्ही गप्प राहणार नाही. न घाबरता, न थांबता आणि खचून न जाता विकासाच्या प्रवासात वाटचाल करणारा हा नवा भारत आहे आणि याचे नेतृत्व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. असा नव्या प्रकारचा भारत तुम्हा सर्वांसमोर येत आहे," असे योगी म्हणाले.
"मुघल सम्राट औरंगजेबच्या आत्म्याने विरोधी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना योग्य जागा दाखवली जाईल. भाजपा केवळ सत्तेसाठी नाही तर विकसित भारत घडवण्यासाठी निवडणूक लढवत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत यात शंका नसावी," असे रोखठोक मत त्यांनी मांडले.