- शुभांगी चेतनस्वयंपाकाची गडबड चालू असताना मुलं पायात घोटाळतातच. मी अमुक करतो, तमूक करतो, मला पोळी करायला दे, मला भाजी करायला दे.. कणीक हातात घेऊन गोळे करायची तर कोण आवड! मी अशावेळी कधीही मुलांना हटकून लांब पाठवलं नाही. आमचा पिटुकला मीरही मिसळणाच्या डब्यातले पदार्थ ओळखू लागलाय. गोड्या मसाल्यापासून सगळं बरं! भावाचा किचनसेट त्याच्या ताब्यात आहे. स्मित सातव्या वर्षापासून पिठलं करतो. त्याला आवडतं ते करायला. काय काळजी घ्यायची सांगितल्यावर मुलं नीट करतात सगळं. लॉकडाऊनमध्ये त्याला नवं काहीतरी करायचं होतं. म्हणाला, ‘मी भजी करतो.’ त्यानं ती रेसिपी वाचली होती. मात्र, प्रत्यक्षात करताना बरेच बदल झाले. तूर, मूग, चणा अशा मिक्स डाळी समप्रमाणात काढून त्यानं त्या पाच-सहा तास भिजत ठेवल्या. वाटल्या. मिरची वाटून घातली; पण म्हणाला, तिखटपण चालतं बरं का मिरची नको असली तर! हिंग, हळदीबरोबर जिरेपूड, धनेपूड अॅड करूया, चांगलं लागेल म्हणाला. विनाबेसनपीठ त्यानं भजी केली. बढिया झाली. रणवीर ब्रारच्या रेसिपी मन लावून बघतो तो. त्याला म्हटलं, बघ तर, रणवीर आवडतो याचं कारण काही रेसिपी छान असते एवढंच नसतं. तो गोष्ट खूप छान सांगतो.
- तर स्मित गोष्टींचा विचार करतोय. आता येते त्याच्या किचनसेटकडे. आम्हाला दोन्ही मुलगे असले तरी त्यांच्या खेळण्यांचा भाग त्यांचा लाडका किचनसेट आहे. तिथं खेळता खेळता आता ते स्वयंपाकघरात शिरलेत. असाच परवा शेजारचा मुलगा आला नि म्हणाला, ‘कुणाचा हा किचनसेट?’ स्मित म्हणाला, आधी माझा होता, आता मीरचा झालाय! तो मुलगा म्हणाला, ‘अरे, हा मुलींचा खेळ असतो. त्याच स्वयंपाक करतात!’ यावर स्मित म्हणाला, ‘असं काही नसतं. आमची आई म्हणते, ज्याला भूक लागते, त्याला स्वयंपाक करता यायला हवा!’ मला अगदीच कळलं की, आपल्या वागण्यातून मुलं अर्थ लावतात. कधी कधी मुद्दाम एखादी गोष्ट शब्दांत सांगावी लागत नाही, वेळ पडते तेव्हा त्यांची तीच गोष्ट तयार करतात, वाढवतही नेतात... म्हणून तर म्हणतेय मी, की आपली मुलं आता घरूनच शिकणार आहेत काही दिवस, तर त्यांना पुस्तकाच्या पलीकडचं काही ‘आॅफलाईन’ शिक्षणही देऊया आपण!(लेखिका, चित्रकार आणि दोन मुलांची आई आहे.)