नागपूर : देशात सिमेंटच्या दरात वाढ होणार असल्याची बाजारात जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. सिमेंटचा दर वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तुरुंगात टाकू, असा इशारा त्यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.देशातील अनेक कुटुंबांचे स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यातच कंपन्यांनी सिमेंटच्या दरात वाढ केली तर त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. देशातील सर्वांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. जर सिमेंट कंपन्या दर वाढविण्याच्या प्रयत्नात असतील तर केंद्र शासन त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडेल. गरीब लोकांना स्वस्त दरात सिमेंट उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारच्या बंद पडलेल्या १० सिमेंट कंपन्यादेखील लवकरच सुरू होतील, असे गडकरी म्हणाले. नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामासंबंधी सर्व अडचणी दूर झाल्या असून, कामासाठी सहा कंपन्यांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. ‘मिहान’चे काम जलदगतीने सुरू असून, अनेक कंपन्या येथे परत येत असून आतापर्यंत १२-१३ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. रोजगाराचे प्रमाण वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)
सिमेंटचे दर वाढविणाऱ्यांना तुरुंगात टाकू - गडकरी
By admin | Published: April 30, 2017 1:35 AM