सातत्यानं स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेचं भाजपाशी मनोमीलन करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढाकार घेणार नाहीए. भाजपाशी युती करायची की नाही, हे शिवसेनेनं ठरवावं. पण राम मंदिराबाबत त्यांनी जी भूमिका मांडलीय, त्यात ते आमच्यासोबत येऊ शकतात, असं संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आज स्पष्ट केलं.
केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत असूनही शिवसेना अगदी नित्यनेमाने नरेंद्र आणि देवेंद्र सरकारवर टीका करतेय. त्यांच्यातील दरी कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतेय. आम्ही स्वबळावरच लढणार, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जवळपास प्रत्येक सभेमध्ये देत आहेत. तरीसुद्धा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही भाजपा नेते युतीबद्दल 'शत प्रतिशत' खात्री देत आहेत.
या दोन 'खास मित्रां'चं काय होणार, शिवसेना भाजपाला 'टाळी' देणार का, याबद्दल भय्याजी जोशी यांना विचारलं असता, त्यांनी सावध उत्तर देऊन या विषयातून अंग काढून घेतलं. मी भाजपाचाही प्रवक्ता नाही आणि शिवसेनेचाही नाही. युतीचं काय करायचं ते त्यांचं त्यांनी बघावं, असं ते म्हणाले. मात्र त्याचवेळी, राम मंदिराबाबत उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या आग्रही भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. २५ नोव्हेंबरला उद्धव अयोध्येला जाणार आहेत. राम मंदिरासाठी सरकावर दबाव वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या मुद्द्यावर शिवसेनेनं संघासोबत यावं, असं आमंत्रणच भय्याजी जोशी यांनी दिलं.
भाईंदरजवळ केशवसृष्टीतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत रा. स्व. संघाच्या तीन दिवसीय बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. या बैठकीदरम्यानच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. त्यात निवडणुकांच्या रणनीतीवरच चिंतन झाल्याचं बोललं जातंय. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील निवडणुकीत भाजपाला संघाची मदत लागणार आहे. त्याचीच आखणी शहा-भागवत यांनी केली असावी, असा अंदाज आहे.