"...त्या कबरीवर काँग्रेसचा झेंडा लावा, शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती मिळेल"; शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 08:33 PM2024-04-13T20:33:31+5:302024-04-13T20:36:08+5:30
...आमच्या त्या कबरीवर शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा, कधी काँग्रेसचा झेंडा, असा वरून लावा आणि त्याला सॅल्यूट मारा. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळेल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार धूमधडाक्यात सुरू आहे. नेते मंडळींचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप, यांमुळे संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यातच आता शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय जहरी शब्दात टीका केली आहे. "आम्हाला गाडलं पाहीजे, आमच्या त्या कबरीवर शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा, कधी काँग्रेसचा झेंडा, असा वरून लावा आणि त्याला सॅल्यूट मारा. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळेल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गाडलं पाहीजे, या वक्तव्यावर बोलतांना संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर थेट हल्ला चढवत जहरी शब्दात टीका केली. ते म्हणाले, "गाडलं पाहीजे, आम्हाला खरंच गाडलं पाहीजे. कारण आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन चाललो. आम्हाला यासाठी गाडलं पाहीजे की, तुम्ही ज्यांच्यासोबत गेलेले आहात, ज्यांच्या बरोबर कधीच जाऊ नका, असं बाळासाहेब म्हणाले, त्यांच्यासोबत गेले आहात. शरद पवारांसोबत गेलात, काँग्रेस सोबत गेलात. आम्हाला गाडलं पाहीजे, आमच्या त्या कबरीवर शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा, कधी काँग्रेसचा झेंडा, असा वरून लावा आणि त्याला सॅल्यूट मारा. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळेल. अशा शब्दात शिवसेना (शिंदे) आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली." ते एबीपी माझासोबत बोलत होते.
उद्धव ठाकरेंच्या लोकल प्रवासावर काय म्हणाले? -
लोकलने प्रवास केला ना? आता ही इव्हेंट करायची वेळ यांच्यावर आली आहे. उद्या यांनी शिवसेना भवनाच्या बाजूला जाऊन वडापाव खाल्ला तरी हे लोक त्याचाही इव्हेंट करतील. यामुळे आता यांच्याकडे इव्हेट करण्याशिवाय काही पर्याय नाही. कालची पालघरची फ्लॉप झालेली सभा आणि त्या घोडबंदर रोडवर असलेली ट्राफिक, पर्याय म्हणून काल ते लोकलने आले आणि त्याचाही इव्हेंट केला. ते एकाही सर्वसामान्य माणसासोबत बोलले नाहीत. लोकलमध्ये बसून मुलाखत करत होते. कसाही आमचा टीआरपी वाढवा, असे शिरसाट म्हणाले.
सर्वसामान्य मुंबईकर रोज लोकलने प्रवास करतो -
शिरसाट म्हणाले, अरे सर्वसामान्य मुंबईकर रोज लोकलने प्रवास करतो. जीव घेना प्रवास, संध्याकाळच्या गर्दीत कधीतरी लोकलमध्ये चढून दाखवा फक्त. जीव मुठीत घेऊन प्रवास करणार माझा मुंबईकर, त्याचीही काल तुम्ही थट्टा उडवली आहे. तो रोज करतो आपल्या जीवनाची संसाराची गाडी चालवतो. त्यांच्या व्यथा तरी त्यांनी समजून घ्यायला हव्या होत्या. पण ते न करता राजाने आता लोकलमध्ये प्रवास केला. हे दाखवण्याचा जो काही पागलपणा केला, ते लोकांना रुचणार नाही.