ठाणे : दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे, मात्र त्या दृष्टीने रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती झालेली नाही. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षेचा नक्की विचार करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. यंदापासून दहावी आणि बारावीची प्रश्नपत्रिका १० मिनिटे आधी देण्याबाबत सूचना केल्या असून, पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या घराजवळ परीक्षेचे सेंटर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. ते ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०१५’चा समारोप समारंभ ठाणे पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानात घेण्यात आला. या वेळी वाहतुकीसंदर्भात घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील ३०० चित्रांच्या कॉफीटेबल बुकचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेते रजा मुराद, अभिनेत्री तनुश्री दत्ता, अभिनेते आदेश बांदेकर, परवीन दुबार, पोलीस आयुक्त विजय कांबळे, सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनेच्या टॅबटेबल योजनेबरोबरच अन्य गोष्टींचा विचार करून एक योग्य योजना अमलात आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. १० वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या पूर्वतयारीचा आढावा घेत परीक्षेसाठी ४ वेळा घंटा वाजवण्यात याव्यात, अशा सूचना केल्याने विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी वर्गात बसवावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षेचा विचार करू
By admin | Published: January 29, 2015 5:32 AM