मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची बैठक राज ठाकरेंनी बोलावली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊया असा सूर उमटल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात आज दादरच्या शिवसेना भवनासमोर काही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. आता तरी राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद घातली होती.
मनसे नेत्यांच्या बैठकीत काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, शिवसेना फुटली आणि भाजपासोबत गेली. त्यानंतर कुठेतरी ठाकरे ब्रँड कायम राहावा यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांकडून मागणी होऊ लागली आहे. याआधी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत आणि त्यानंतरच्या विधानसभेतही मनसे-शिवसेना एकत्र येण्याची चर्चा झाली होती. तेव्हा राज ठाकरेंनी उघडपणे आमच्याकडून कुठलीही अडचण नाही. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी साथ दिली नाही. मात्र काल राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात मराठी माणसांच्या हितासाठी, ठाकरे ब्रॅंड जपण्यासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र यावे अशी विनंती राज ठाकरेंसमोर मांडली. ही जनभावना असल्याचे नेते म्हणाले. कार्यकर्त्यांचीही ही मागणी असल्याचे राज ठाकरेंना सांगण्यात आले. त्यावर राज ठाकरेंनी कुठलेही भाष्य केले नाही. परंतु ते म्हणाले, त्यांच्या पक्षात सध्या काय चाललंय ते चालू द्या. बैठका होऊ द्या, घडामोडी घडू द्या. आपण एकला चलो रेच्या माध्यमातून काम केले पाहिजे. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. त्यांच्या घडामोडी पूर्ण झाल्यावर जो काही निर्णय व्हायचा असेल तो होईल. तुम्ही काम करा. काम करू, पुढे काय होतंय ते पाहू असं सांगत राज ठाकरेंनी स्पष्ट भूमिका न मांडता पक्षातील नेत्यांना काम करण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्रातील घडामोडीवर मेळाव्यात बोलेन – राज ठाकरे
राज्यात गेल्या २ अडीच वर्षापासून जे राजकारण सुरू आहे. ते दिवसेंदिवस किळसवाणे होत आहे. या लोकांना मतदारांशी काही देणेघेणे नाही. पक्षाचे मतदार पक्षाला का मतदान करत होते याचा विसर पडलाय. लोकांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. मी आगामी काळात मेळावा घेणार आहे. लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. जागोजागी जाईन लोकांना भेटेन. शरद पवार किती काही म्हणत असले त्यांचा संबंध नाही. पण दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल असेच जाणार नाहीत. सुप्रिया सुळे उद्या केंद्रात मंत्री झाल्यावर आश्चर्य वाटणार नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत असे बॅनर लागले आहेत. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी या सर्व प्रकारावर मी मेळाव्यात बोलेन असं सांगत पक्षाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे सूचक विधान केले आहे.