पुणे : माजी पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी अडत बंदबाबत काढलेल्या आदेशाला राज्य शासनाने कायमस्वरूपी स्थगिती द्यावी अन्यथा राज्यातील भुसार व भाजीपाल्याचा संपूर्ण व्यापार बंद केला जाईल, असा इशारा सोमवारी राज्यव्यापी व्यापारी परिषदेत देण्यात आला. डॉ. माने यांनी अडत बंदचा आदेश काढल्यानंतर व्यापारी व अडतदारांत नाराजी पसरली. त्यानंतर लगेचच शासनाने या आदेशाला तात्पुरती स्थगिती देत व्यापाऱ्यांच्या संतापावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर दी पुना मर्चंट्स चेंबरतर्फे सोमवारी पुण्यात राज्यव्यापी परिषद घेण्यात आली. चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती अध्यक्षस्थानी होते. परिषदेत फॅमचे अध्यक्ष मोहन गुरनानी, चेंबरचे उपाध्यक्ष प्रवीण चोरबेले, मानद सचिव जवाहरलाल बोथरा, सहसचिव अशोक लोढा, माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले यांच्यासह राज्यभरातून ५०० पेक्षा जास्त व्यापारी उपस्थित होते. परिषदेमध्ये सहा ठराव करण्यात आले.याबाबत संचेती यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, पणन संचालकांनी अडतीबाबत काढलेल्या आदेशाला कायमस्वरूपी स्थगिती द्यावी, ही व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, ती शासनाकडे आपले म्हणणे मांडेल. त्यानंतरही शासनाने अडतीला कायमस्वरूपी स्थगिती न दिल्यास राज्यातील सर्व व्यापारी आपला व्यवसाय बेमुदत बंद करतील. वेगवेगळ््या राज्यांमध्ये अडत शेतकऱ्यांकडून न घेता ग्राहकांकडून घेतली जाते. मग राज्यात का नको, असे म्हटले जाते. याची पाहणी करण्यासाठी शासनाने समिती नेमावी व तेथील परिस्थितीचा अभ्यास करावा, असे सांगत अन्य राज्यांतील शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे, असा दावा संचेती यांनी केला.च्शेतकऱ्यांना शेतमाल स्वत:च विकायचा असेल तर बाजार समितीने स्वतंत्र व्यवस्था करून द्यावी. सध्याच्या अडत पद्धतीत कोणताही बदल करू नये़ महाराष्ट्रात बहुतांशी माल परप्रांतातून येतो व तो माल व्यापारी आणतात. त्यामुळे व्यापारी माल, शेतकऱ्यांचा माल यासाठी वेगवेगळे कायदे असायला हवेत़ राज्य सरकारने मॉडेल अॅक्ट स्वीकारावा, असे ठराव करण्यात आले आहेत.
राज्यातील व्यापार बंद करू
By admin | Published: January 06, 2015 1:24 AM