भारताविरोधात कारवाया करण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद पोसत असल्याचे सातत्याने समोर येऊ लागल्याने पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एफएटीएफचे निर्बंध टाळण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे. दरम्यान, 1993 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्येच लपून बसला असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने शनिवारी प्रथमच दिली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी 'दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा' अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
रोहित पवार यांनी रविवारी (23 ऑगस्ट) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींकडे मागणी केली आहे. "अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं पाकिस्तानने कबूल केलं आहे. आता दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा" अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. दाऊद इब्राहिम आपल्याच भूमीवर असल्याची कबुली पाकिस्तानने काल दिली होती. मात्र अवघ्या 24 तासांच्या आत पाकिस्ताननं यू-टर्न घेत दाऊद देशात वास्तव्यास नसल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने स्वत:च दाऊदच्या वास्तव्याची कबुली दिल्यानं त्याबद्दलचं वृत्त भारतीय माध्यमांनी दिलं. त्यानंतर पाकिस्तानने स्पष्टीकरण दिलं. दाऊद पाकिस्तानात नसल्याचा दावा त्यांनी केला.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. 'पाकिस्तानकडून नवे निर्बंध घातले जात आहेत, अशा बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत. मात्र यात अजिबात तथ्य नाही. काही कुख्यात व्यक्तींचं (दाऊद इब्राहिम) वास्तव्य देशात असल्याची कबुली पाकिस्तानने दिल्याचं वृत्त भारतीय माध्यमांनी दिले आहे. या वृत्ताला कोणताही आधार नाही,' असं स्पष्टीकरण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे.
पाकिस्तानने दिली होती कबुली
फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पाकिस्ताननं 88 दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांची यादी जाहीर केली. त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. त्या यादीत दाऊद इब्राहिमच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे पाकिस्तानने पहिल्यांदाच दाऊद त्यांच्या भूमीवर वास्तव्यास असल्याची कबुली दिली. इम्रान खान सरकारनं प्रसिद्ध केलेल्या यादीत दाऊदच्या नावापुढे व्हाऊस हाऊस, कराची असा पत्ता आहे.
दाऊद आपल्या भूमीत वास्तव्यास असल्याची बाब पाकिस्ताननं कायम नाकारली आहे. मात्र आता पाकिस्तान फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी आपण दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असल्याचं दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळेच पाकिस्तानकडून कारवाईचा दिखावा केल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्टमधून ब्लॅक लिस्टमध्ये झाल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : स्वत:वर कोरोना लसीची चाचणी करायचीय?, 'या' आहेत अटी, जाणून घ्या नेमकं कसं असणार?
काय सांगता? समोस्यामध्ये सापडली साबणाची वडी, डॉक्टरांच्या कँटीनमधील धक्कादायक घटना
Bihar Elections 2020 : बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस सज्ज; भाजपा कार्यकारणीशी साधला संवाद
CoronaVirus News : चिमुकल्यांना मास्क लावणं गरजेचं आहे की नाही?, WHO ने जारी केले नवे नियम
'ती' भेट ठरली जीवघेणी! प्रेयसीला लपूनछपून भेटणं पडलं महागात, गावकऱ्यांनी केली तरुणाची हत्या