मुंबई : कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण अनुभवत आहोत. सध्या अनेक बंधने शिथिल केली असली तरी संकट संपलेले नाही. ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, असे लक्षात येईल त्यावेळी आपल्याला नाइलाजाने लॉकडाऊन लावावे लागेल, असा स्पष्ट इशारा देतानाच संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करू या, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले.
स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालय प्रांगणातील राष्ट्रध्वजारोहण समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यांसमोर ठेवून स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्त्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात अनेक जण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या स्वातंत्र्याचे मूल्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपल्याला स्वातंत्र्य असेच नाही मिळाले, अनेकांच्या संघर्षातून आणि संकल्पातून उभ्या राहिलेल्या लोकचळवळीने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. मागच्या दीड वर्षात कोरोनाचे पारतंत्र्य आपण अनुभवत आहोत. यानिमित्ताने मी माझा देश, राज्य कोरोनापासून मुक्त करणार आणि पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करणार असा निश्चय करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
तसेच, राज्यातील राष्ट्रपती पदके मिळवलेल्या पोलिसांचा तसेच इतर पुरस्कार विजेत्यांचा नामोल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्यांचा गौरव आणि अभिनंदन केले. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कोरोना योद्ध्यांची भेट घेत विचारपूस केली. त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.