बुलडाणा : 'आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी 'नाम' ही संस्था सुरू केली.. सुरुवातीला मकरंद व मी होतो, आता खूप लोक जुळलेत.. नाम ही संस्था म्हणजे आमची मालकी नाही.. कुणीही अध्यक्ष नाही, कुणीही सेक्रेटरी नाही.. क पाळाला गंध लावताना आपण नाम घेतो तसे हे आहे.. एकदा नाम घेतले की, ते मरे पर्यंत सोडायचे नाही.. आता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धीर देण्यासाठी आयुष्य द्यायचे आहे.. यामध्ये तुमची साथ मोलाची आहे.. नाम सर्वांचे आहे.. सर्वांनी त्यात हातभार लावूया.. चला सर्वांनी 'नाम'पंथी होऊया!' अशा भावपूर्ण शब्दांत प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी बुलडाणेकरांना साद घातली. स्थानिक गर्दे सभागृहात नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी नाना पाटेकर हे बोलत होते. मंचावर मकरंद अनासपुरे यांच्यासह नामचे विदर्भप्रमुख हरीश इथापे, बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, अँड. दीपक पाटील, अँड. विजय सावळे आदी उपस्थित होते. नाना पाटेकर यांनी कुठलीही औपचारिकता न करता थेट संवाद साधला. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धीर देण्यासाठी निघालो आहे. आव्हान मोठे आहे, पण मी माझ्या परीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये सहभागी होणार्या सहकार्यांनी ह्यनामह्णला बट्टा लागेल असे कुठलेही काम करू नका, असे कळकळीचे आवाहन नाना पाटेकर यांनी केले. आयुष्य जगत असताना मी खूप काही कमावले. ते माझ्या पुरते पुरेस आहे का, यामधून मी काही मदत देऊ शकतो का, असा विचार करा. आ पल्याभोवती बांधलेल्या भिंती दूर करा. म्हणजे बाहेरच्या जगातील दु:ख, वेदना तुम्हाला दिसतील अन् या वेदनेने तुम्ही व्यथित होत असाल, तर नाममध्ये सहभागी होऊन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे अश्रू पुसण्याचे काम करा.. मी माझ्या आयुष्याचे हेच जीवितकार्य म्हणून स्वीकारले आहे. मरेपर्यंत आता तेच करणार.. जगण्याचे कारण विदारक आहे, पण त्याची दाहकता मला संपवायची आहे. आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो, तुम्ही साथ द्या.. भगिनींनो, हार मानू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशा शब्दांत नाना पाटेकर यांनी उपस्थित शेकडो महिलांना धीर दिला. प्रांरभी मकरंद अनासपुरे यांनी नामची भूमिका मांडली. शेतकरी कुटुंबातील वेदनांची जाण असल्याने नाम उभे राहिले. या माध्यमातून आमचा लहानसा प्रयत्न असल्याचे सांगत, या कार्यात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले. बुलडाणा येथे नामचे कार्यालय उघडण्यात आल्याचे मकरंद अनासपुरे यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमास शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे संचलन रणजितसिंग राजपूत यांनी केले.
चला.. सर्व ‘नाम’पंथी होऊया!
By admin | Published: October 26, 2015 1:57 AM