जालना : भाजप मुस्लिमांच्या विरोधात आहे, हे चित्र रंगवले जात आहे. त्यात तथ्य नाही. काही तुमचे मुद्दे असतील, तसे काही माझेही मुद्दे आहेत. ते सारे दूर ठेवून आपण एका व्यसपीठावर येऊन चर्चा केली पाहिजे. ‘दूध का दूध दूध’ केले पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला.रविवारी शहरातील विविध भागात दानवे यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन झाले. तसेच येथील विघ्ने लॉन्सवर ईदमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत नाव न घेता खोतकरांवर हल्ला चढविला.दानवे म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून आपण राजकारणात आहोत. १९९९ पासून खासदार या नात्याने जालना शहराशी संबंध आला. त्यामुळे गेल्या २० वर्षांत जालना शहराच्या विकासासाठी कोणत्या नेत्याने काय केले, याचा उहापोह सर्व नेत्यांना एका व्यासपीठावर बोलावून झाला पाहिले. यावर चर्चा झाली पाहिजे. त्यातूनच कळेल की, जालन्याच्या विकासासाठी कोणी काय केले? तेव्हाच ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल असे थेट आव्हान दानवे यांनी दिले.जालना बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहाराची तुलना त्यांनी थेट लालू प्रसाद यांच्या घोटाळ्यासोबत केली. सध्या बाजार समितीचे सभापती हे अर्जुन खोतकर आहेत. विशेष म्हणजे ही टीका करत असताना बाजार समितीचे उपसभापती आणि त्यांचे चुलत बंधू भास्कर दानवे हे व्यासपीठावर होते.दानवे म्हणाले, मी गेल्या ३५ वर्षांपासून राजकारणात आहे. आपण साधे आणि गरीब आहोत. गरीब मी दोन्ही अर्थाने आहे. पैशाने देखील गरीबच आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात भाजप आहे, हे चुकीचे आहे. एकदा तुम्ही आणि मी एकत्रीत येऊन विविध मुद्यांवर चर्चा करू असे खुले आवाहनही त्यांनी यावेळी खोतकरांना केले.राजकारणात ‘बाप’दुसऱ्या एका कार्यक्रमात दानवे यांनी राजकारणात आपण सगळ्यांचे ‘बाप’ असल्याचे सांगितले. ‘मातोश्री’वर मला प्रवेश देऊ नये म्हणून स्थानिक नेत्याने प्रयत्न केले ही बाब सर्रास चुकीची आहे. हे नेते परदेशात असताना येथे शिवसेनेचा पाच जिल्ह्यांतील महत्वाचा मेळावा होतो, यावरूनच ते कोणत्या वाटेवर आहेत हे सांगण्याची गरज नसल्याचेही दानवे यांनी सांगितले.
होऊन जाऊ द्या दूध का दूध ! नामोल्लेख न करता दानवेंचा खोतकरांवर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 5:45 AM