ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 22 - शेतक-यांना अच्छे दिन आणू, जय जवान, जय किसान असे वातावरण देशात तयार करु, असे आश्वासन भाजपाने निवडणुकीवेळी दिले होते. मात्र, सध्याची स्थिती मर जवान, मर किसान अशी झाली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पिंपरीत आत्मक्लेश पदयात्रेदरम्यान सत्ताधा-यांवर केली. निवडणुकीवेळी देण्यात आलेल्या आश्वासनांना शेतक-यांसह आमच्यासारखे शेतकरी नेते भुलले. त्यामुळे आम्ही निघालो होतो, देवाच्या आळंदीला पण चोराच्या आळंदीला आलो की काय असा संभ्रम निर्माण झाल्याचं ते म्हणाले आहे. मात्र, समाजाच्या विविध घटकातील व्यक्तींच्या नैतिक पाठबळावर मुर्दाड राज्यकर्त्यांना एक दिवस गुडघे टेकायला लावू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यातून महात्मा फुले वाडा येथून सोमवारी आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव,लक्ष्मी त्रिपाठी यांच्यासह विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी पदयात्रेत सहभाग घेतला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलेही दिंडी काढून पदयात्रेत सहभागी झाले.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातील शेतकऱ्यांच्या मालाला रास्त दर दिला जाईल असे आश्वासन दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. भाजपला निवडून देण्याचे आवाहन आम्ही केले होते.त्यामुळे या सरकारला निवडून आणण्यात अमचाही वाटा आहे. त्यामुळे पश्चाताप घेण्यासाठी ही आत्मक्लेश पदयात्रा काढत असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.