अशोक इंगळेसिंदखेडराजा : ज्या जिजाऊने शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे. ही बाब चिंताजनक असून मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री ना.पांडुरंग फुंडकर हे होते तर व्यासपिठावर खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.शशिकांत खेडेकर, आ.संजय कुटे, आ.अॅड.आकाश फुंडकर, माजी आ.तोताराम कायंदे, माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जि.प.अध्यक्षा उमाताई तायडे, महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, मुकाअ षण्मुखराजन एस., विनोद वाघ, जि.प.सदस्या सरस्वती वाघ, राजेश लोखंडे, ज्योती खेडेकर यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात पंकजा मुंढे पुढे म्हणाल्या की, मुलींना जन्म घेण्याचा अधिकार नाकारल्या जात आहे. मुलगी कधीही आई-वडिलांना अंतर देत नाही, मग आपण का त्यांना नाकारतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या मातेच्या उदरात मुलगी असते, ती माता अश्रू ढाळते, ही प्रवृत्ती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली. या योजनेचा लाभ म्हणजे एका मुलीवर कुटुंब नियोजन करेल, त्या मुलीच्या नावे ५० हजार रुपये डिपॉझीट करण्यात येईल. दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणा-याला त्या दोन मुलींच्या नावे प्रत्येकी २५-२५ हजार रुपये टाकण्यात येतील. त्या पैशाच्या व्याजावर मुलीचे संगोपन, शिक्षण, आरोग्य यावर खर्च केले जातील. बेटी बचाव बेटी पढाव ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. त्याच धर्तीवर आम्ही भाग्यश्री योजना सुरू केली.
ग्रामविकास या योजनेबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामीण भागातील रस्ते एवढे खराब आहेत की २५-२५ वर्ष या रस्त्यकडे कोणी पाहिले नाही. ग्रामविकास योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात ११४ कोटीची कामे मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार कि.मी. रस्त्याचे काम येत्या पाच वर्षात पूर्ण करणार आहोत. माझ्या खात्याचा कणा अंगणवाडी सेविका आहे. त्यांच्या मानधनात वाढ करुन २८० कोटीचा बोजा वाढला आहे. येत्या अधिवेशनात ३८० कोटी वाढीव बजेट मंजूर करुन त्यांची भाऊबीज ही दुप्पटीने वाढणार आहे. संघर्ष यात्रेचा शुभारंभ जिजाऊ मातेचे दर्शन घेवून याच नगरीतून केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात परिवर्तन झाले. पाच वर्षात महाराष्ट्राचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. सर्वप्रथम पंकजा मुंडे यांचेहस्ते माझी कन्या भाग्यश्री या रथाची फित कापून शुभारंभ केला. ही रथयात्रा सिं.राजा ते चोंढी पर्यंत आणि नायगाव पर्यंत जाणार आहे.
एकाच मुलीवर कुटुंब नियोजन करणा-या मातांचा सत्करयावेळी एका मुलीवर कुटुंब नियोजन करणा-या प्रणाली अविनाश दिवाले, श्रावणी दिलीप चव्हाण, सविता संजय कुलथे, प्रणीता समाधान चौधरी या पाच महिलांना प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान ना.पंकजा मुंडे यांनी केला. त्याच बरोबर वक्तृत्व स्पर्धेतील मुलींचा सन्मान करण्यात आला.