अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत, याची काळजी घेऊ; शरद पवारांनी मोदींवरही केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 02:59 PM2023-11-16T14:59:36+5:302023-11-16T15:00:24+5:30
अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार या आमदार अनिल पाटलांच्या वक्तव्यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन वेगळे आहे. कुठेही असलो तरी, दिवाळी एकत्र साजरी करतो ही आमच्या घराची पद्धत आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्या घरी भाऊबीजेला गेल्यावरून दिले आहे. याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार या आमदार अनिल पाटलांच्या वक्तव्यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रधानमंत्री सांगतात ज्या गोष्टी त्या पद्धतीचे राजकारण कधी पाहिले नाही. जवाहरलाल नेहरू यांचे भाषण पाहिले, पण असे कधी घडले नाही. पहिले प्रधानमंत्री पाहिले जे कुठल्याही राज्यात गेले की व्यक्तिगत हल्ले करतात. व्यक्तिगत हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे, अशी टीका पवारांनी मोदींवर केली.
राम मंदिराचे दर्शन मोफत करवू, असे सांगितले जातेय. यांचा अर्थ कुठल्या पातळीपर्यंत राज्यकर्ते गेलेत हे समजतेय. देवाचे दर्शन कुठे विकत असते का? असा सवाल पवार यांनी अमित शहांना केला आहे.
अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील येणाऱ्या निवडणुकीत निवडून येणार नाहीत. त्यांच्या मतदारसंघात मी जाऊन आलो, त्याची नीट काळजी आम्ही घेऊ, असा इशारा पवार यांनी दिला आहे. महाविकास आघाडीत ४८ पैकी बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे. काही जागांवरच विचार सुरु असल्याचे पवारांनी स्पष्ट करत आपण जनतेसमोर पर्याय ठेवू. सोलापूर आणि माढा अशा दोन्ही मतदार संघात आमची महायुती जिंकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.