मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यापासून आपल्यासमोर कधीच पर्याय नव्हता. महात्मा गांधींनी ठरविले म्हणून नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर जितके देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा लोकांना पर्याय होता का? मग आत्ताच ही पर्यायाची चर्चा का? नरेंद्र मोदींना संधी दिली, त्यांनी देश खड्ड्यात घातला. आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या. खड्ड्यात घालतील किंवा देशाचे चांगलेदेखील करून दाखवतील. त्यांना संधी तर देऊन बघू या, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रथमच आपला पाठिंबा व्यक्त केला.
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथील सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपवर सडकून टीका केली.
नरेंद्र मोदी नशीबवान आहेत की त्यांना पंतप्रधानपद मिळाले. अनेक इच्छुक राजकारणातून निघून गेले, पण त्यांना हे पद मिळाले नाही. अफाट बहुमत घेऊन आलेला हा पंतप्रधान; पण देशाची पार वाट लावून टाकली. देशाला संकटातून बाहेर काढायचे असेल तर त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. मोदी आणि शहामुक्त भारत व्हावा म्हणून निवडणूक न लढविता मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. येत्या काही दिवसांत राज्यभर आठ ते दहा सभा घेणार. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला. भाजपवाल्यांची कुजबुज सुरू आहे की राज ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे वापरून घेत आहे. मी इतका वेडा नाही. शिवाय, आत्ता जो निर्णय घेतलाय तो विधानसभेलापण लागू आहे असे अजिबात नाही, असेही राज म्हणाले.
नोटाबंदीच्या आधी भाजपने देशभरात जमिनी घेऊन ठेवल्या. दिल्लीत तर एक लाख ७० हजार स्क्वेअर फुटांचे आॅफिस बांधले. सेवन स्टार आॅफिस बांधायला पैसे कुठून आले, असा सवाल करतानाच नोटाबंदीमुळे नोटाबंदीनंतर देशात ४ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ९९.३% पैसे बँकेत परत आले, म्हणजे नोटाबंदी फसली. त्या वेळी मोदी म्हणाले होते की, जर ५० दिवसांत सगळे सुरळीत नाही झाले तर मला कोणत्याही चौकात हवी ती शिक्षा द्या. मोदी तुम्ही चौक ठरवा, आता शिक्षा द्यायला आम्ही येतो, असे राज म्हणाले.
फसव्या योजना, आधीच्या सरकारच्या योजनांची नावे बदलून रेटायचे उद्योग सुरू आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील, हे मी काही वर्षांपूर्वीच सांगितले होते. आज मोदी आणि शहा तेच करत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर युद्धसदृश्य परिस्थती निर्माण केली. सैनिकांच्या हौतात्म्याचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न मोदींनी चालविला आहे. हे सगळं करणाऱ्या मोदींना प्रश्नही विचारलेले चालत नाही. कोणी प्रश्न विचारला की देशद्रोही ठरविले जाते. ही देशद्रोही ठरविण्याची कल्पना हुकूमशहा एडॉल्फ हिटलरची आहे. त्यानेदेखील त्याला विरोध करणाºया प्रत्येकाला देशद्रोही ठरवले होते. तेच आता मोदी करत आहेत. ही हिटलरची पुनरावृत्ती आहे, असे राज म्हणाले.