मुंबई : हिवाळी अधिवेशन झाले की, आपण दोघे राज्यात फिरून २००० ते २०१४ या कालावधीत रस्त्यांची अवस्था काय होती आणि आता काय परिस्थिती आहे, याची सखोल चर्चा करू, असे थेट आव्हान बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे. फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एकाच दिवशी १ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याबाबत भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना एक पत्र पाठवले होते. त्यात म्हटले होते की, ‘भाजपा शिवसेना सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून राज्यात एक हजार कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे एकाच दिवशी भूमिपूजन करून नवीन काहीतरी जगावेगळे केले, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक, २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात मंजूर असलेल्या नियमित कामे एकत्रित केली गेली आहेत, शिवाय यातील अनेक कामांचे स्थानिक आमदारांनी आधीच भूमिपूजन करून घेतले आहे.राज्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कामांची देखभाल करणेसुद्धा आता सा.बां. विभागाला अवघड झाले आहे. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात अशी धूळफेक करण्यापेक्षा, आहे त्या रस्त्यांची तरी देखभाल करावी, अशी अपेक्षा भुजबळ यांनी पत्रात व्यक्त केली होती. (विशेष प्रतिनिधी)ज्येष्ठत्वावरून टोमणाभुजबळ यांच्या या पत्राला पाटील यांनी तितकेच ‘खोचक’ उत्तर दिले आहे. ते म्हणतात, ‘आपला या खात्यातील अनुभव ‘दांडगा’ आहे. राज्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे हे खरे आहे, पण मागील १० ते १५ वर्षांच्या काळात झालेली ही अधोगती असून, आपण आपल्या पत्रातून एकप्रकारे प्रांजळ कबुलीच दिली असून, यातून आपले ‘ज्येष्ठत्व’ सिद्ध होते. त्यामुळे राज्यात कोठे आणि कधी जायचे हे ठरविण्यासाठी माझ्या कार्यालयात किंवा घरी आपले स्वागत आहे,’ असा चिमटाही काढला आहे. विशेष म्हणजे पाटील यांच्या कार्यालयातून हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आले.
चला दोघे मिळून रस्ते पाहून येऊ!
By admin | Published: December 03, 2015 1:28 AM