मुंबई : आतापर्यंत पेंग्विन केवळ परदेशात पाहाण्यास मिळत होते. आता ते मुंबईतही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या दर्शनावर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. परदेशात जाऊ न शकणाऱ्या मुलांना त्यांचे दर्शन घेऊ द्या, असे शुक्रवारी उच्च न्यायालयाने म्हटले.द. कोरियातून मुंबईत आणलेल्या पेंग्विनना इथले हवामान मानवणार नाही, तसेच भायखळा प्राणिसंग्रहालय त्यांची नीट काळजी घेत नसल्याने त्यांना मायदेशात परत पाठवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका काही वकिलांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुडे होती.गेल्या सहा वर्षांत भायखळा प्राणिसंग्रहालयात ४४४ प्राणी मृत्यू पावल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘गेल्या वर्षी ६७ प्राणी गेले. पेंग्विन ठेवण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून एका वर्षाची परवानगी मागितली होती. मात्र, भायखळा प्राणिसंग्रहालयाचे काम पाहून, त्यांनी केवळ सहा महिन्यांचीच परवानगी दिली. ‘जे राष्ट्रीय प्राण्यांची काळजी नीट घेऊ शकत नाहीत, ते परदेशी प्राण्यांची काळजी कशी घेणार,’ असा प्रश्नही अॅड. सेठना यांनी उपस्थित केला.सिंगापूरमध्ये पेंग्विनची पुरेपूर काळजी घेण्यात येते, मी प्रत्यक्ष पाहिले आहे, असे सेठना यांनी सांगताच, उच्च न्यायालयाने तुमच्याप्रमाणे अन्य लोक परदेशात जाऊन याचा आनंद घेऊ शकत नाहीत, असे म्हटले. ‘तुमच्याप्रमाणे सर्व लोक परदेशात जाऊन पेंग्विनना पाहू शकत नाही. त्यामुळे परदेशात न जाऊ शकणाऱ्या मुलांना त्यांना पाहून आनंद लुटू द्या,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)
...त्या मुलांना पेंग्विन बघू द्या!
By admin | Published: March 25, 2017 2:43 AM