राजेवाडी : पुरंदर तालुक्यातील विमानतळाबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी चर्चा करून विमानतळाबाबत योग्य तो निर्णय घेऊन याबाबत शेतकऱ्यांच्या बरोबर राहणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सात गावांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.राजेवाडी, पारगाव, वाघापूर, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, आंबळे येथील विमानतळाविरोधातील शेतकरी महिलांनी पुण्यात गुरूवारी खासदार सुपिया सुळे यांची भेट घेतली. या वेळी आमच्या जमिनी विमानतळाला देणार नसल्याचे महिलांनी सांगितले आम्हाला पुरंदर उपसा योजनेमुळे व आधुनिक पद्धतीने शेती करून लाखो रुपये मिळत आहेत. आज आमची मुले नोकरी न करता उत्तम शेती करीत आहेत. आम्हाला आमच्या शेतात सर्वांना काम आहे; त्यामुळे आम्हाला जमिनी विमानतळाला द्यायच्या नाहीत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.तुमच्या जमिनी कोणीही बळजबरीने घेऊ शकत नाही. जिल्हाधिकारी सौरभ राव, पालकमंत्री गिरीश बापट, तालुक्याचे लोकप्रतिनिधी विजय शिवतारे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनही शेतकऱ्यांचा विरोध असेल, तर विमानतळ कोठेही न्या, असे शासनाला सांगू, असे सुप्रिया सुळे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. या वेळी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष्या वैशाली नागवडे, पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे, वाघापूरचे माजी सरपंच बाजीराव कुंजीर, पारगावचे ग्रामपंचायत सदस्य संतोष रोकडे, संतोष कुंजीर, विलास कडलग, राजेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य किरण जगताप, गणेश मेमाणे, विट्ठल मेमाणे, संतोष मेमाणे, बाळासाहेब होले, जयवंत नेवसे, राजेंद्र होले, वर्षा मेमाणे, अर्चना मेमाणे, दक्षता मेमाणे, नर्मदा मेमाणे यांच्यासह सात गावांतील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)>विमानतळाबाबत सात गावांतील वस्तुस्थिती लोकमतने मांडली. ताई, तुम्ही आमच्या पाठीशी उभ्या राहा. आमचे आम्हाला गाव जमिनी सोडून कोठेही जायचे नाही, असे सांगून ग्रामपंचायत सदस्या दक्षता मेमाणे यांना अश्रू अनावर झाले. माझी दोन मुले सैनिक असून मी व माझे कुटुंब वर्षाला पाच लाख रुपये शेतीतून कमवत आहोत. जमिनी गेल्यावर आम्ही पाच रुपयांना महाग होऊ. आम्हाला जमीन द्यायची नाही, असे ज्येष्ठ महिला नर्मदा मेमाणे यांनी सांगितले.
विमानतळाबाबत चर्चेतून मार्ग काढू
By admin | Published: November 04, 2016 1:24 AM